फ्रीडम अँड डेस्टिनी: जेंडर, फॅमिली अँड पॉप्युलर कल्चर इन इंडिया (पुस्तक)
फ्रीडम अँड डेस्टिनी : जेंडर, फॅमिली अँड पॉप्युलर कल्चर इन इंडिया हे पुस्तक स्त्रीवादी व समाजशास्त्रज्ञ लेखिका पेट्रीशिया ऑबेरोय द्वारा लिखित ८ लेखांचे संकलित पुस्तक आहे. हे पुस्तक २००६ मध्ये ओक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस नवी दिल्लीत प्रकाशित झाले. या पुस्तकात लेखिका लोकप्रिय संस्कृतीच्या अभ्यासाद्वारे भारतीय जनमानसाच्या कल्पना विश्वातील विविध संस्थांचे जसे भारतीय कुटुंब, सहजीवन आदी तसेच स्त्रियांचे व मुलांचे कुठल्या प्रकारचे प्रतिकं उमटतात याचे परीक्षण केले आहे. प्रस्तावना सोडल्यास पुस्तकातील वेगवेगळे लेख तत्पूर्वी इतर पुस्तकांमध्ये व मासिकांमध्ये आलेले आहेत[१]. नंतर त्यांचे रूपांतर एका खंडात केलेले आहे. पेट्रीशिया ऑबेरोय या पुस्तकाची सुरुवात, नवी दिल्लीच्या एका ट्रकच्या मागील बाजूस इंग्रजीत चुकीच स्पेलिंग वापरून लिहिलेल्या एका अपमानकारक उक्तीच्या (Beautyfull Wife, Denger Life) विश्लेषणाद्वारे करतात. हे विश्लेषण खंडातल्या इतर लेखांसाठी सुरुवात ठरते.
सारांश
[संपादन]८ भागांमध्ये विभागलेले हे पुस्तक लोकप्रिय संस्कृतीतील तीन घटकांच्या (चित्रपट, दिनदर्शिकेवरील चित्र व मासिकांमध्ये छापून आलेल्या प्रणयकथा) विश्लेषणाद्वारे कुटुंब व सामाजिक जीवनातील विरोधाभास पुढे आणते.
दिनदर्शिकेवरील चित्र
[संपादन]लेखिका वसाहतकाळापासून (१९व्या शतकातील उत्तरार्ध) भारतात छापण्यात आलेल्या दिनदर्शिकेवरील चित्रांद्वारे पूर्वीच्या कल्पनांचा मागोवा घेतात. त्यांच्या विश्लेषणाद्वारे त्या अधोरेखित करतात कि लोकप्रिय संस्कृतीच्या या प्रकारात स्त्री शरीराला जास्त दृश्यता मिळालेली दिसते व त्या 'प्राप्त करण्याची इच्छा करण्याजोगी वस्तू' किंवा 'विकण्याजोगी वस्तू' म्हणून सादर केलेल्या दिसतात. त्या हे सुद्धा दाखवून देतात कि स्त्रिया केवळ भोगाच्या वस्तू म्हणूनच नव्हे तर आधुनिक राष्ट्राच्या प्रतिक म्हणून ही दृश्यता पावतात. लेखिका हिंदू देवींच्या प्रतीमांचे चित्रण हिंदू देवांचे सोबती किंवा माता म्हणून केले जाणे व त्याचे सामाजिक व राजकीय परिणामांचे परीक्षण देखील करतात व या माध्यमातून स्त्रीत्वाच्या विविध धारणांचे ते विश्लेषण करतात.[२] या पुस्तकात दिनदर्शिकेवर मुलांचे होणारे विविध चित्रणांचाही मागोवा ऑबेरोय घेतात. त्यांच्या मते मुलांना दैवी बालक (God -Baby ), स्वागतेच्छुक बालक (Welcome -Baby), वीर-बालक (Hero -Baby), गिऱ्हाईक बालक (Customized Baby) म्हणून दर्शविलेले दिसते. त्या फक्त कलेच्या स्वरूपाचेच विश्लेषण करत नाहीत तर त्याचे उदय व लोकप्रियतेमागील सामाजिक-राजकीय अर्थकारण ही स्पष्ट करतात.
लोकप्रिय चित्रपट
[संपादन]ओबेरॉय विषयवस्तूत वैविध्य असलेले व भिन्न काळांमध्ये प्रदर्शित झालेले भारतातील अत्यंत लोकप्रिय अशा चार हिंदी चित्रपटांचे (हम आपके हैं कौन, 'साहेब, बीबी और गुलाम'[३], परदेस, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे) परीक्षण, त्यांचे विषयवस्तू, कल्पना व त्यातून पुनर्उत्पादित होत असलेल्या संस्थांच्या आधारावर करताना दिसतात. या परीक्षणाच्या आधारावर ते विविध कलाप्रकारातील सर्वसाधारण नियमांवर पण भाष्य करतात. उदा० कुठले अवकाश हे पुरुषसत्ता अधिक मजबूत करतात व कुठले त्यांना उलथून लावण्यास अवकाश निर्माण करतात. 'साहेब, बीबी और गुलाम' वरील लेखामध्ये चित्रपटातील कथानकाच्या परीक्षणाद्वारे लेखक मांडतात की चित्रपटाचे कथानक हे व्यक्तिगत इच्छा व सामाजिक जबाबदारी, तसेच स्त्री पुरुष संबंधांमध्ये स्वातंत्र्य व नशीब यावर केंद्रित आहे.[४] हम आपके हैं कौन या चित्रपटावर आधारित लेखांमध्ये अशाहे चित्रपटांत भारतीय कुटुंब व त्यात सत्ता व कर्तव्यांची वाटाघाट कशी होते यावर दृष्टिक्षेप टाकलेला आहे. 'परदेस' व 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटांच्या परीक्षणात लेखिकेनी 'विदेशात वसलेले भारतीय' व घर व देश या संकल्पनांवर प्रकाश टाकला आहे.
प्रणयकथा
[संपादन]ओबेरॉय हे 'विमेन्स एरा (Women's Era )' या इंग्रजी मासिकात येणाऱ्या प्रणयकथांच्या विश्लेषणाद्वारे दाखवून देतात की या कथा स्त्री वाचकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण व धोक्याची सूचना देण्याचे कार्य पार पाडतात. त्या जाणीवपूर्वक याचाही उल्लेख करतात की कथानक व शैली जरी एकसारखी वाटत असली तरीही या कलेच्या स्वरूपाला अनुभवण्याच्या व स्वीकारण्याच्या पद्धतीत पाश्चात्त्य देशांमध्ये व भारतात फरक आहे. या चित्रपटांचे ठराविक साचेबंद कथानकं कशा प्रकारे एका आनंदी पारंपरिक भिन्नलिंगी सहजीवन व कौटुंबिक जीवनाबाबत विविध पर्याय समोर ठेवतात हे ओबेरॉय या विभागात दाखवून देतात.
मूळ शीर्षक
[संपादन]पुस्तकाच्या प्रस्तावनेत ओबेरॉय लिहितात की, मुळात त्यांना या पुस्तकाचे शीर्षक ' धर्म आणि तीव्र इच्छा' असे ठेवायचे होते, जेणेकरून स्त्रियांसाठी परंपरेने व संस्कृतीने ठरवलेल्या अपेक्षा व स्त्रियांच्या इच्छा यांच्या संघर्षांमधील भारतातील स्त्रीवाद्यांचे योगदानही समाविष्ट करता येतील. नंतर त्यांनी पुस्तकाचे शीर्षक 'फ्रीडम अँड डेस्टिनी' असे ठेवले. त्यांच्या मते यामुळे कुटुंब व सामाजिक जीवन यांतील नैतिक अर्थकारण ओळखणे शक्य होईल, व आधुनिकतेच्या धारणांमुळे वैयक्तिक स्वायत्तता व स्त्री/ पुरुष दोघांचेही स्वातंत्र्य कसे नष्ट झाले हेही बघणे शक्य होईल.
हे पण पाहा
[संपादन]संदर्भसूची
[संपादन]- ^ http://www.jstor.org/stable/23620719?seq=1#page_scan_tab_contents
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-18 रोजी पाहिले.
- ^ https://www.youtube.com/watch?v=J96iqBABJFU
- ^ "संग्रहित प्रत". 2016-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-18 रोजी पाहिले.