फटका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. अनंत फंदींनी त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडितशिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.

कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका:

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी असा आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणी तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधी फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करू नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलूं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करूनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको
एकाहूनू चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधीं विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकू नको
सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

-अनंतफंदी