प्रल्हाद महाराज रामदासी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बालपण
[संपादन]मुुकुंदशास्त्री काळे आणि गंगाबाई या सात्त्विक व धर्मपरायण दांपत्यापोटी प्रल्हाद महाराजांचा जन्म मेहकर तालुक्यातील वेणी या छोट्या गावी इ. स. १८९३ मध्ये झाला. महाराजांचे शालेय शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत रिसोड येथे झाले. त्या वेळी शाळेतील सर्व मुलांनी टोळ मारण्यासाठी आले पाहिजे, असे शिक्षकांनी फर्मान काढले. महाराजांनी त्यास साफ नकार दिला आणि शाळा कायमची सोडली. अहिंसा परमो धर्म: हे तत्त्व मानणारे प्रल्हाद जीवजंतूंची हत्या करायला तयार नव्हते.
प्रल्हाद महाराजांना बालणापासून भौतिक जीवन नीरस आणि शुष्क वाटू लागले. याउलट आध्यात्मिक जीवनात त्यांचे मन रमू लागले. त्यामुळे त्यांनी रिसोड येथे सखाजीशास्त्री यांच्याकडे अध्यात्मविद्येचे प्राथमिक धडे घेतले. काळे कुटुंबात दिवसभर, पूजापाठ, जपतप, अग्निहोत्र, अन्नदान, उपासना वगैरे होत असे. सारे वातावरण अध्यात्माला अनुकूल, तसेच प्रेरणादायी होते. परिणामतः प्रल्हाद महाराजांचे जीवन सुसंस्कारित झाले. महाराज आठ-दहा वर्षांचे असताना घरातील अंधारकोठडीत अथवा साखरखेर्डा येथील जवळच्या एखाद्या गुहेत जाऊन जप करीत असत. बरीच रात्र झाली तरी महाराज घरी न आल्याने घरची मंडळी चिंताग्रस्त होऊन महाराजांना शोधत असे..
प्रल्हाद महाराजांचे बालमन सद्गुरूचा शोध घेऊ लागले. अशा वेळी त्यांना चिखली तालुक्यातील किन्होळा या गावी रामानंद महाराज भेटले. त्यानंतर इ. स. १९१० मध्ये हनुमान जयंतीच्या शुभदिनी साखरखेर्डा येथे प्रल्हाद महाराजांनी रामानंदाचा अनुग्रह घेऊन त्यांचे शिष्यत्व स्वीकारले.
विवाह
[संपादन]वयाच्या सोळाव्या वर्षी प्रल्हाद महाराजांचा विवाह मेहकर येथे बालाजी मंदिरात कृष्णाबाईशी झाला. हा विवाह रामानंद महाराजांनी ठरविला होता.. नवदांपत्याने प्रथम भेटीत आजीवन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून अखंड रामसेवा करावयाची, असा दृढसंकल्प केला आणि खरा करून दाखविला.
सन १९१८ मध्ये महाराजांवर दैवी आपत्ती कोसळली. एका पंधरवड्यात महाराजांचे वडील, दोन ज्येष्ठ बंधू आणि भावजय असे चौघेजण एन्फ्ल्यूएंझाच्या साथीमध्ये मृत्युमुखी पडले. महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व कुटुंबाची जबाबदारी एकट्या महाराजांवर पडली. अशाही परिस्थितीत त्यांची गुरूसेवा व रामोपासना यांत यत्किंचितही खंड पडला नाही, अथवा त्यांत न्यूनता आली नाही. रामानंद महाराजांनी सांगावे आणि प्रल्हाद महाराजांनी त्याचे तंतोतंत पालन करावे, असा अनुभव येत असे.
सन १९२० मध्ये रामानंदांनी गृहदानाचे सूतोवाच करताच प्रल्हाद महाराजांनी सर्व संपत्तीसह आपले राहते घर ब्राह्मणांना दान केले. गृहदानानंतरही ते गोदान, द्रव्यदान, सतत अन्नदान आणि नामदान करीत असत.
कार्य
[संपादन]प्रल्हाद महाराजांनी अनेक ठिकाणी रामाची व मारुतीची मंदिरे उभारली. आजीवन रामनामाचा प्रसार आणि प्रचार केला. भजनपूजन, कीर्तन, प्रवचन, उपासना, १३ कोटी रामनाम, यज्ञयाग, रामायण व भागवत सप्ताह, तीर्थयात्रा इत्यादींच्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्गाला लावले. रामनामावर त्यांंचा सर्वाधिक भर होता. सर्व भाविकांना ते आवर्जून सांगत, ‘‘रामनाम घ्या. सदासर्वकाळ रामाचा आठव करा. नामाचे अनुसंधान करा, नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा. देवाचे स्मरण ते जीवन, देवाचे विस्मरण ते मरण हे विसरू नका. मानवमात्राच्या वाट्याला जी सुखदःखे येतात ती देवाच्या इच्छेनुसारच. कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम् रामरायच आहेत, असे पक्के समजा. सतत नामस्मरण करून रामाची करुणा भाका. रामराय तुमचं कोटकल्याण करील,’’ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराज होत. महाराज म्हणजे नामैव केवलम् असे समीकरणच झाले होते, ते नामावतार म्हणूनच ओळखले जात.
प्रल्हाद महाराजांचा मोठा शिष्यवर्ग आहे.
मृत्यू
[संपादन]सन १९७५ मध्ये प्रल्हाद महाराजांना पोस्ट्रेट ग्रंथीचा आणि हर्नियाचा त्रास होऊ लागला. त्यांवर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली. तथापि, प्रकृतीमध्येे उत्तरोत्तर क्षीणता येत गेली. त्यांचे नामस्मरण मात्र अखंड चालू असे. महाराज दररोज रामनामाचा साठ हजार जप करीत. दरम्यानच्या काळात इंदूरचे ख्यातनाम वैद्यराज श्रीरामनारायणशास्त्री यांनी महाराजांची प्रकृती अत्यंत काळजीपूर्वक तपासली व नाडीपरीक्षाही केली. असे म्हणतात की वैद्यराजांनी महाराजांच्या नाडीमधून रामनामाचा ध्वनी ऐकू येतो असे खात्रीपूर्वक सांगितले.
प्रल्हाद महाराज कार्तिक शु. ४ सन १९७९ रोजी निधन पावले.