Jump to content

प्रणवानंद सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वामी प्रणवानंद सरस्वती हे मूळचे नेपाळचे. तारुण्यातच सर्वसंगपरित्याग करून ते गुरूच्या शोधार्थ हिमालयात गेले. पुढे काशीत त्यांची भेट स्वामी रामानंद सरस्वती यांच्याशी झाली. त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतल्यावर ते मध्य प्रदेशात ओंकारेश्वर येथे आले. तेथेच गुरू सान्निध्यात त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले.

स्वामी प्रणवानंद सरस्वती हे मार्कंडेय आश्रमाचे परमाध्यक्ष असून साधूंना वेदान्ताचे शिक्षण देण्याचे काम ते करत असतात. सात्त्विक, निःसंग आणि प्रसिद्धिपराङ्‌मुख म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या आश्रमाच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि काशी येथे शाखा आहेत.

शंकराचार्य राष्ट्रीय पुरस्कार

[संपादन]

भारतातील वैदिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या आचारसंपन्‍न व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. स्वामी प्रणवानंद सरस्वती यांना ४था ’भगवत्‌ पूज्यपाद आदि शंकराचार्य राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्र्यंबकेश्वराजवळील शिव-शक्ती आश्रमाच्या प्रांगणात शंकराचार्यांच्या जयंती दिनी म्हणजे ४ मे (२०१४) या दिवशी हा पुरस्कार सोहळा होईल. मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र आणि २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.