पोवळे
| लघुनाम | C. rubrum |
|---|---|
| वर्गाचे नाव | Corallium rubrum |
| वर्गिकरणातील प्रतवारी | species |
| पालक वर्ग | Corallium |
| स्थानिक नाव | Red coral |
| This taxon is source of | red coral |
पोवळे उर्फ प्रवाळ हे सीलेंटेरेटा (आंतरगुही) प्राणिसंघाच्या मुख्यत्वे अँथोझोआ वर्गातील [म्हणजेच ॲक्टिनोझोआ] व काही हायड्रोझोआ वर्गातील प्राण्यांनी किंवा प्राणिसमूहांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या बाह्य कंकालांचे (सांगाड्यांचे) उबदार सागरांत तयार झालेले निक्षेप (साठे) म्हणजे पोवळे होय. या प्राण्यांनाही सामान्यत: पोवळे असे संबोधण्यात येते.
सामान्यत: हे प्राणी म्हणजे बाह्य कंकाल निर्माण करून त्यात राहणारी लहानशी समुद्रपुष्पेच होत. पोवळ्यातील जीव (पॉलिप समूहातील व्यक्तिगत प्राणी) स्वतःभोवती एक चषकासारखा, अरीय (त्रिज्यीय) वरंबे (कणा किंवा कंगोरे) असलेला कंकाल निर्माण करतो. हा कंकाल मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेटयुक्त (अॅरॅगोनाइटाचा बनलेला) असून तो प्राण्याच्या बाह्यस्तरापासून स्रवला जातो. कंकाल नेमका कसा निर्माण होतो ह्याविषयी निश्चित अशी कल्पना नाही. तरीही बाह्यस्तराभोवती स्रवलेल्या कलिली आधारद्रव्यात कॅल्शियमी स्फटिकांचे अवक्षेपण होऊन (न विरघळणाऱ्या साक्यात रूपांतर होऊन) कंकालनिर्मिती होते, असे बहुतेकजण मानतात. कंकाल-रचना ही बरीच क्लिष्ट असून निरनिराळ्या पोवळ्यांत ती भिन्न प्रकारची असते. काही प्रकारांत कंकालाच्या शाखोपशाखाही असतात. कालांतराने प्राणी मेले, तरी पोवळ्यांचे कंकाल तसेच राहतात.
पोवळ्यास प्रवाल, प्रवाळ तसेच विद्रुम असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रत्न समजले जाते. लाल, गुलाबी,निळी,काळी,पांढरी अशा अनेक रंगांची पोवळी असतात. हे रंग लोह व कॅल्शियमी जैव पदार्थांच्या संयोगाने तयार होणाऱ्या रंगद्रव्यांमुळे निर्माण होतात. रंगांच्या विविध छटाही असू शकतात. उदा.,लाल रंगात पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लालसर,सशाच्या रक्तासारखे, डाळिंबाच्या फुलासारखे शेंदरी,कमळाच्या पाकळीप्रमाणे लाल अशा छटा पाडल्या जातात. पोवळ्याची किंमत त्याचा रंग, तेज, भरीवपणा, घट्टपणा, घडणावळ कशी आहे इ. गोष्टींवर अवलंबून असते. पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल किंवा पिवळ्या रंगात लाल झाक असलेले, तकतकीत, लांबट, गोलाकार, सरळ, स्निग्ध, जाडसर, छिद्रे नसलेले, वजनदार पोवळे श्रेष्ठ प्रतीचे समजतात. पांढरट, रेखा, पटल, ठिपके,छिद्रे असलेले किंवा फूट असलेले पोवळे निकृष्ट प्रतीचे समजले जाते.
पोवळ्यांचा उपयोग माळा, अंगठ्या, कंकण, ब्रूच (कपडा नीट बसण्याकरिता लावायची नक्षीदार टाचणी किंवा अडकवण) इ. अलंकार व जडजवाहीर तयार करण्यासाठी केला जातो. राजदंड, पावा, साज, शोभेच्या वस्तू व हत्यारे मढविण्यासाठीही पोवळी वापरली जातात. पोवळी कापून विशिष्ट आकार देणे, त्यांना तकाकी आणणे, त्यावर उत्तम कोरीव काम करून निरनिराळ्या आकृत्या व नक्षीचे उठावकाम करणे हा फार मोठा कलात्मक व्यवसाय असून हे काम इटालियन कारागीर अत्युत्कृष्ट करतात. मंगळ ग्रहाच्या पिडेचे निवारण करण्यास पोवळे हे रत्न अंगावर धारण करण्यास सांगितले जाते. रोमन लोक पोवळ्याचा उपयोग पीडानिवारणार्थ व औषधासाठीही करीत असत. आयुर्वेदात पोवळे हे कान्तिवर्धक, त्रिदोषनाशक, दृष्टिदोषनाशक, विषनाशक, शुक्रवर्धक म्हणून मानले जाते. मधुमेह, रक्ती मूळव्याध, मूत्र विकारांत विशेषतः मौल्यवान पोवळी भस्मीकरण करून वापरली जातात. औषधासाठी प्रवाळभस्माचा वापर म्हणूनच आयुर्वेदात सांगितलेला आहे. प्रवाळभित्तीपासून निकर्षणाने (खणून व खरवडून काढण्याच्या क्रियेने) व उत्स्फोटनाने मिळणारे द्रव्य रस्ते बांधण्यास उपयोगी पडते.
