पृथ्वीगीर हरिगीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी (जन्म : यवतमाळ, इ.स. १८७६; - १४ मार्च, इ.स. १९३१) हे एक मराठी पत्रकार, ज्ञाति-इतिहास संशोधक आणि लेखक-संपादक होते. ते पृथ्वीगीर हरिगीर या नावाने लिखाण करीत असत.

पृथ्वीगीर हरिगीर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ‘हरिकिशोर’ या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या लिखाणामुळे ब्रिटिश आमदानीत त्यांच्यावर खटला भरला गेला, आणि त्यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली.

पृथ्वीगीर हरिगीर यांनी लिहिलेला संशोधनात्मक ग्रंथ[संपादन]

गोसावी व त्याचा संप्रदाय भाग १ (इ.स. १९२६) आणि भाग २ (इ.स. १९३१) : गोसावी संप्रदाय हा शूद्रवर्णी असल्याची चुकीची माहिती सरकारी दप्तरांत होती. वेद-उपनिषदांच्या साहाय्याने गोसावी हा ब्राह्मण वर्गातील संप्रदाय असल्याचे पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी या ग्रंथातून सप्रमाण सिद्ध केले. ऐतिहासिक आणि तत्कालीन कर्तृत्त्ववान गोसाव्यांच्या घराण्यांचा परामर्शही त्यांनी हा ग्रंथात घेतला आहे.

गोसाव्यांमधील अरण्य, आश्रम, गिरी, तीर्थ, पर्वत, पुरी, भारती, सरस्वती, आणि सागर या दहा उपनामांवरून पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी ‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा थेट वेदकाळापर्यंत नेऊन पोहोचविली आहे व त्यांची गोत्रप्रवरादी माहितीही दिली आहे. गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ ते ‘यज्ञ करणारा गृहस्थ असा देतात आणि गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता, असे मत मांडतात. ही दहा उपनावे शंकराचार्यांपूर्वीपासून रूढ आहेत, असे पृथ्वीगीर हरिगीर यांनी लिहिले आहे.