पुष्प चिकित्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुष्प चिकित्सा (इंग्लिश: Flower Remedy) ही होमिओपॅथीमधील उपचारांची एक विशिष्ट पद्धत आहे.यात पुष्पांचे विविध भाग वापरून औषधोपचार केला जातो. त्यासाठी फुलांच्या सौम्य द्रावणाचा वापर केला जातो. या पद्धतीचा जनक एडवर्ड बाश हा आहे. त्याने या पद्धतीचा शोध सन १९३०मध्ये लावला.

वनस्पतीवर आलेल्या फुलांवर पडणाऱ्या दवबिंदूंमध्ये त्या वनस्पतीचे गुण उतरतात, असा बाशचा विश्वास होता. त्या दवबिंदूंचे द्रावण औषधाप्रमाणे वापरून तो उपचार करीत असे.

बाख फ्लॉवर थेरपी[संपादन]

डॉ.बाख फ्लॉवर थेरपी मध्ये फुलांचा आरोग्यासाठी वापर केला जातो. डॉ.एडवर्ड बाख हे या पद्धतीचे जनक आहेत. सर्वसाधारण उपचारपद्धतीत रोग्यापेक्षा त्यांच्या रोगाचाच जास्त विचार केला जातो. त्यामुळे वरवर जरी रोग बरा झाला असे वाटले तरी त्या रोगाचे मूळ मानवाच्या शरीरात घट्ट पाय रोवून असते. माणसाच्या मनात ज्या वेगवेगळया प्रकारच्या नकारात्मक भावना असतात त्याच खऱ्या रोगासाठी कारणीभूत असल्याचे डॉ.बाख यांच्या लक्षात आल्यावर त्या नकारात्मक भावनाच नष्ट झाल्या तर मानव नक्कीच व्याधिमुक्त होईल ह्याची त्यांना खात्री पटली. निसर्गोपचाराच्या तत्त्वप्रणालीनुसार, मानव हा निसर्गनिर्मित प्राणी असल्यामुळे त्याच्या नकारात्मक भावना नष्ट करण्याची शक्ती नक्कीच निसर्गात असणार ह्या विश्वासामुळे अथक परिश्रम केल्यानंतर नैसर्गिक फुलातच ही शक्ती त्या विधात्याने भरली असल्याचे त्यांना आढळून आले तेव्हा त्यांनी कोणत्या व्याधीसाठी / नकारात्मक भावनांसाठी कोणते फूल उपयोगी पडते याबाबत विविध प्रयोग केले व फुलांचे अर्क तयार केले.

माणसाच्या मनाचे पडसाद निरनिराळया लक्षणांच्या रूपात शरीरावर पडत असतात त्यामुळे जर माणसाचे मन निरोगी असेल तर साहजिकच शरीर स्वस्थ रहाते. परंतु मन जर अशांत असेल, सतत तणावाखाली असेल, मनातले विचार जर विकृत असतील, एकतर अती मनक्षोभ किंवा मनात कुढण्याची वृत्ती असेल तर शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित होत नाही. Physiological order बदलते व त्याचा परिणाम म्हणून शरीरात विषद्रव्यांचा संचय वाढत जातो व आम्लपित्त, सुस्ती, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, निद्रानाश इ. सारखे विकार उद्भवतात.


डॉ.बाख फ्लॉवर थेरपी पद्धतीत नकारात्मक विचार नष्ट करण्याची शक्ती असल्यामुळे त्या फुलांच्या अर्कामुळे मनातील दोष नाहीसे होतात व तन, मनाची शुद्धी होऊन एका अदृश्य शक्तीने शरीर व्यापून जाते व सतत ही औषधे घेतल्यास (निदान २ महिने) दोष कायमस्वरूपी नाहीसे होतात, असे बाख यांचे म्हणणे होते. .

ह्या पद्धतीमध्ये एकूण ३८ औषधे.

           गर्भारपण, प्रसूती व बाळाचा जन्म ह्या तीनही अवस्थांमध्ये बाईच्या मानसिक भावना महत्त्वाच्या असतात. अशा वेळी स्त्रियांच्या शरीरावर व मनावर येणाऱ्या ताणासाठी बाख औषधी हा उत्तम उपाय आहे. मनातील भीतीसाठी “मिम्युलस” व खूपच  भीती वाटत असेल तर “रॉक रोज” ही औषधे.  मन व शरीर शांत राहण्यासाठी, आराम वाटण्यासाठी “व्हरव्हेन” व “इम्पेशन्स” ही औषधे लागू होतात. प्रचंड तणावाखाली वावरत असूनही हसरा मुखवटा धारण करणाऱ्या व्यक्तींसाठी “ॲग्रीमनी”. शरीर व मन दोन्हींची शुद्धी करणारे औषध, एखाद्या गोष्टीची, व्याधीची घृणा वाटणे यासाठी “क्रॅप ॲपल”. कुठल्याही प्रकारच्या बदलास किंवा नवीन परिस्थितीस सामोरे जावे लागल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी “वॉलनट”. सकारण भीती, चिंता म्हणजेच परीक्षा, एखादा रोग, अंधार, मृत्यू, वृद्धत्व इ. बद्दल वाटणारी भीती याकरिता “मिम्युलस” हे औषध अत्यंत गुणकारी आहे. 

“रेस्क्यू रेमेडी” ह्या औषधाच्या नावातच त्याचा उपयोग कळून येतो. आणीबाणीच्या प्रसंगी (उदा.अपघात, मृत्यू इ.) किंवा अचानक बसलेल्या धक्क्यातून मनाला सावरणारे औषध घराघरातून First Aid म्हणून अवश्य संग्रही ठेवण्यासारखे हे औषध आहे. रेस्क्यू रेमेडी हे ५ औषधे मिळून केलेले एक औषध आहे. ह्यातील पाचही औषधे वेगवेगळया कारणांसाठी उपयोगी आहेत.

१. स्टार ऑफ बेथलहेम - एखाद्या घटनेचा धक्का (शॉक) बसल्यास

२. रॉक रोज - भीती वाटणे व गोंधळ घालणे

३. इम्पेशन्स - मानसिक त्रास, चंचलता

४. चेरी प्लम - नैराश्य

५. क्लीमॅटिस - मूर्च्छितावस्था

मधमाशांचा दंशयुक्त वेदना असह्य असतात. अशा वेळी रेस्‍क्यू रेमेडी दिल्यास सूज उतरते आणि वेदना पण कमी होतात. दाढ दुखत असेल, तरी रेस्‍क्यू रेमेडी हा चांगला उपाय आहे.

डॉ.एडवर्ड बाख यांनी पुष्पौषधीच्या स्वरूपात मानवाला दिलेले हे एक वरदानच आहे.