पुरुसेरे कत्तुना
पुरुसेरे कत्तुना किंवा पुरुषमक्कल कुनीता हा कर्नाटक राज्यातील लोकसंस्कृती मधील नृत्य नाट्य कलाप्रकार आहे. यालाच असेही स्थानिक भाषेत सिद्धवेश/सिद्धवेस असेही म्हणले जाते.[१] सुल्लिया, बेलथनगड्डी, पुत्तुर येथील तुळू गौडा समाजाचे सदस्य तुळु दिनदर्शिकेनुसार सुग्गी महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे स्वरूप सामाजिक आणि धार्मिक आहे. हा उत्सव संध्याकाळी सुरू होतो आणि पहाटेपर्यंत सुरू राहतो. यामध्ये समाजातील विविध स्तरातील लोकांच्या घरी भेट देणे आणि लोकनृत्य-नाट्य सादर करणे हे याचे स्वरूप आहे.[२]
सांस्कृतिक महत्व
[संपादन]दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मंगलोर जवळच्या लहान-मोठ्या गावांमधे लोकदेवतांची उपासना आढळून येते. पंजुर्ली, सत्यदेवता, गुलिका अशा देवता इथे पूजनीय आहेत. या सर्व देवतांची उपासना करणारा एक उत्सव तुळुनाडू परिसरात चैत्र पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते.[३]
स्वरूप
[संपादन]धार्मिक परंपरेतील नाथ पंथ याच्याशी या कलाप्रकाराचा संबंध मानला जातो. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत याचे सादरीकरण सुरू असते. संन्यासी, भातृ आणि दास्य ही यातील प्रमुख पात्रे असतात. मंगलोरपासून ४५ किमी अंतरावर धर्मस्थल नावाचे मंजुनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. अनेक भक्तगण येथे श्रद्धापूर्वक भेट देतात. याच मंजुनाथाचे मुख्य ठाणे हे मंगलोरजवळच कद्री मंजुनाथ मंदिर येथे आहे. कद्री मंजुनाथ मंदिर परिसरातच नाथपंथाचा एक मठही आहे. येथे नवनाथांची उपासना केली जाते. सिद्धवेस हा नाथ संप्रदायातील गौड जमातीच्या सदस्यांनी सादर केलेला नृत्य नात्य प्रकार आहे. महाराष्ट्राच्या कोकण भागातील दशावतारी खेळे, संकासूर, गोमू, राधा शिमगोत्सवाच्या काळात घरोघरी जाऊन खेळे सादर करतात त्याच्याशी प्राथमिक स्तरावरचे सिद्धवेसाचे साम्य दिसून येते. मंजुनाथ देवतेची प्रतिकृती किंवा अन्य कोणत्याही समकक्ष स्थानिक लोकदेवतेची प्रतिकृती सिद्धवेस या कलाप्रकारात मुख्य देवता म्हणून पूजिली जाते. पुरोहित, गावातील एखादा वृद्ध, तीन-चार इस्लाम पंथाचे अनुयायी, विविध मुखवटे घातलेली सोंगे, स्थानिक फुले खोवून तयार केलेले कागदी मुकुट घातलेली लहान लहान मुले, नारळ सुपारीच्या झाडांची वेशभूषा केलेले कलाकार अशी विविध पात्रे या खेळात असतात. या खेळात केवळ पुरूष आणि मुलेच सादरीकरण करू शकतात. महिला आणि मुली केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत असतात. काही वेळेला याच खेळात लोकदैवतांची वेशभूषा आणि रंगभूषा केलेले कलाकारही सहभागी होतात.[३]
पूर्वतयारी
[संपादन]ज्या घरासमोर हा खेळ सादर होणार आहे त्या घरच्या शेणाने सारवलेल्या अंगणातील तुळशी वृंदावनासमोर रांगोळी वा फुलांची सजावट केली जाते. तुळशीपुढे पितळी समई प्रज्वलित केली जाते. आणखी एक समई घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करून ठेवली जाते.
- वेशभूषा-
खेळाच्या सुरुवातीला कलाकारांची रंगभूषा, वेशभूषा तीन ते चार तास आधी सुरू होते. यासाठी कोणतीही कृत्रिम रंगभूषा साधने वापरली जात नाहीत. हळद, कुंकू, काजळ यांचा वापर करून चेहरा रंगवला जातो आणि नारळी पोफळीच्या सोपटांचे बारीक धागे वापरून पोशाख तयार केले जातात. कापडी पोशाखही वापरले जातात.[३]
सादरीकरण
[संपादन]तीनसांजेला वांद्यांच्या तालावर लोकदेवतेची मूर्ती डोक्यावर घेऊन छोटीशी मिरवणूक काढली जाते ज्यामधे खेळातील सर्व कलाकार घराच्या अंगणालाच तीन प्रदक्षिणा घालतात. विशिष्ट तालावर पायांच्या विशिष्ट हालचाली करीत सर्व कलाकार प्रदक्षिणा पूर्ण करतात. नंतर केवळ उत्स्फूर्ततेने सादर केला जाणारा, कोणतीही बांधेसूद संहिता नसलेला, संवादाचा पूर्वसराव नसलेला नाट्य नृत्यप्रकार सुरू होतो. या सर्व सादरीकरणामधे समाजातील निम्न स्तरातील लोकांचा सहभाग असल्याने अर्वाच्य भाषेतील विनोदी संवाद, ज्ञानी पंडितांवर केलेली टीका आणि या सर्वातून होणारी विनोदनिर्मिती उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन करते. ठराविक काळानंतर सर्वजण मिळून लोकदैवताची आरती करतात, प्रसाद वाटतात आणि सादरीकरणाची समाप्ती होते.[३]
प्रसाद अथवा नैवेद्य
[संपादन]खेळ संपल्यावर गावजेवण दिले जाते. यजमान कुटूंब सांबार, भात, इडली, एखादी मांसाहारी भाजी आणि दुधात शिजविलेली घट्ट खीर म्हणजेच पायसम् याचे भोजन देते. खेळ सादर केल्याबद्दल कलाकारांना रोख स्वरूपात मानधन दिले जाते, सुपारी, तांदूळ, नारळ असेही दिले जाते. कुटुंबातील स्रिया जाड पोहे, ताजा खोवलेला नारळ आणि गूळ यांचे मिश्रण कालवून त्याचाही प्रसाद तयार करतात.[३]
चित्रदालन
[संपादन]-
मंजुनाथ देवतेचे पूजन
-
कलाप्रकार सादरीकरण
-
कलाप्रकार सादरीकरण होताना वाद्यांची साथ
-
खेळातील सहभागी लहान मुलांचे फुलांचे मुकुट
-
कलाप्रकार चित्रीकरणपूर्व कलाकारांची तयारी
-
सादरीकरणात वापरले जाणारे घुंगरू
-
धर्मस्थळ जवळील स्थानिक लोकदेवता मंदिर
-
पंजूर्ली देवता कलाकार रंगभूषा
संदर्भ
[संपादन]- ^ Varadpande, Manohar Laxman (1987). History of Indian Theatre (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 978-81-7017-278-9.
- ^ Sangeet Natak (इंग्रजी भाषेत). Sangeet Natak Akademi. 1999.
- ^ a b c d e जोशी, आर्या (२०२३). लोकदैवतांची उपासना अर्थात पुरुसेरेकत्तुना. सातारा: मासिक रघुवीर समर्थ ( श्रीरामदास स्वामी संस्थान, सज्जनगड). pp. १५-१७. ISBN - Check
|isbn=
value: length (सहाय्य).