पुरुषोत्तम नारायण फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री (जन्म : कुध्रे -रत्‍नागिरी जिल्हा, १ मे १९१५; - रत्‍नागिरी, २४ एप्रिल २०१५) हे रत्‍नागिरीतील संस्कृतचे एक गाढे अभ्यासक होते. व्याकरणवाचस्पती दिगंबरशास्त्री जोशी काशीकर गुरुजी यांच्याकडे त्यांचे अध्ययन झाले होते.

अध्ययन[संपादन]

पु.ना. फडके यांनी १९३२ ते १९४४ या एका तपात त्यांनी अत्यंत कठीण अशा परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेची व्याकरणचूडामणी आणि काशीच्या संस्कृत विद्यापीठाची व्याकरणाचार्य अशा दोन पदव्या मिळविल्या. त्याशिवाय बडोदे आणि म्हैसूर संस्थानच्या व्याकरण परीक्षेत त्यांनी उच्च श्रेणी मिळविली.

अध्यापन[संपादन]

फडकेशास्त्री यांनी रत्‍नागिरीच्या फाटक प्रशालेत १९४२ पासून शिक्षकी पेशा स्वीकारला. तेथे संस्कृत आणि प्राकृत (अर्धमागधी) या भाषांचे अध्यापन त्यांनी केले. तसेच १९४७ पासून संस्कृत पाठशाळेत प्रधानाध्यापकपदही त्यांनी भूषविले. या दोन्ही सेवांमधून ते १९७३ साली निवृत्त झाले.

धार्मिक उपक्रम[संपादन]

फडक्यांनी निवृत्तीनंतर आचरणास अत्यंत कठीण असे गायत्रीपुरश्चरण केले. रत्‍नागिरीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध विधियुक्त स्वाहाकार, वेदांचे घनपाठ, वेगवेगळे याग आणि होम त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पार पाडले.

व्याख्याने व लेखन[संपादन]

फडके यांनी विविध विषयांवर दहा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. सुबोध उपनिषत्सार आणि सुबोध योगवासिष्ठसार या प्रमुख ग्रंथांसह सहा पुस्तके त्यांनी लिहिली.

सामाजिक कार्य[संपादन]

फडकेशास्त्रींनी शिक्षक कल्याण निधी, रत्‍नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्‍नागिरी संचय सहकारी सोसायटी अशा संस्था स्थापन करून त्यांना पुढील काळात स्थर्य प्राप्त करून दिले.

कौटुंबिक माहिती[संपादन]

पुरुषोत्तम नारायण फडके यांचे दोन्ही पुत्र उच्चविद्याविभूषित आहेत. लेखिका आशा गुर्जर ही त्यांची कन्या, तर लेखक रवींद्र गुर्जर हे त्यांचे जामात होत.