Jump to content

पारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पारायण म्हणजे काय? ते कसे करावे?[संपादन]

धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत, विशिष्ट पद्धतीने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचणे़ कोणत्याही ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते़ म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते़.

त्यामुळे खऱ्या साधकांनी निष्काम पारायण करून नाथकृपा संपादन करावी़ काही सांसारिक कामनापूर्तीची आभलाषा ठेवून जे पारायण केले जाते ते सकाम पारायण जाणावे़ देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतु ठेवून तसा संकल्प उच्चारणे; कार्य तडीस जाण्यास मी अमुक एवढी पारायणे करेन असे देवाला सांगणे हे सकाम पारायण़ अशा पारायणानेसुद्धा भाविकांची कार्ये सिद्धीस जातात़ देवाच्या/सद्गुरूंच्या दैवी, अगाध शक्तीचे पाठबळ लाभते़.

प्रारंभ कसा करावा[संपादन]

ग्रंथकर्त्याने कोणत्याही शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर पारायणास आरंभ करावा. २७ नक्षत्रांपैकी आश्र्वनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे शुभ जाणावी़ गुरुवार, शुक्रवार आपल्या इष्ट देवतेचा वार हे दिवस पारायणारंभ करण्यास शुभ आणि प्रशस्त आहेत़ विशेषकरून गुरुकृपेस पात्र ठरण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर आरंभ करण्याचे सुचविले आहे़.

पारायण करताना त्या भक्‍ताने आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने पुसून स्वच्छ करावी. रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर वस्त्र घालून वाचावयाची पोथी व सद्‍अगुरूंचा फोटो असल्यास तो मांडावा. चौरंगावर उजव्या बाजुस पाण्याने भरलेला कलश धान्यराशीवर ठेवावा.. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी़.अत्यंत भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून प्रार्थना करून त्या

दैवतास आवाहन करावे. अशाप्रकारे मांडलेल्या विडयांचे हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून पुजन करावे. आता मांडलेले ते विडे नसुन आमंत्रित दैवते आहेत या भावनेतुन त्यांची पूजा रोज करून धुपदीपाने ओवाळणी करावी.

समई वा दीप प्रज्वलीत करावा़ पारायणारंभापासून तो समाप्तीपावेतो दीपज्योत सतत तेवत ठेवावी़ कलशपूजन, दीपपूजन करावे़ सोबतच आसन, शंख व घंटा यांची पूजा करावी़. गणेश, कुलदेवता यांना वंदन करावे़ घरातील वडिलधाऱ्या मंडळीस साष्टांग नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत़.

श्री आपले आत्मकल्याण तसेच सकळांचे मंगल चिंतून पारायणाचा संकल्प उच्चारावा़ तळहातावर उदक घेऊन देवाच्या चरणी आपली इच्छा व्यक्त करावी़.

आपण ज्या कामासाठी पारायणास बसणार आहोत. ते कारण, आपण एकूण किती पारायण करणार आहोत हे भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून ह्या दैवतांना सांगून व त्यावेळी पाळणार असणारे नियमही सांगावेत.

नंतर नारळ चौरंगावरील कलशावर ठेवावा. १०८ वेळा इष्ट देवतेचा अथवा कुलदेवतेच्या मंत्राचा जप करावा़. दुध, खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करावा.

आसनावर बसून वाचन कारावे. जे नियम पहिल्या दिवशी पाळू तेच नियम समाप्तीपर्यंत पाळावेत. पोथी वाचण्यापुर्वी आंघोळ करून सोवळे किंवा धूतवस्त्र नेसावे . सकाळच्या वाचनाला सूर्य देवतेची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते, म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालते. मात्र एकचवेळी पारायण केल्यास ज्यावेळी सुरुवात केली असेल त्याच दैवताच्या साक्षीने समाप्ती करावी. म्हणजे पोथी सकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सकाळी करावी व सायंकाळी सुरू केली असल्यास सायंकाळी समाप्ती करवी. साध्या नेहमीच्या पारायाणात नियम जास्त कडक नसले तरी पोथी वाचनाच्या काळात मांसाहार करु नये, शुचीर्भूतता पाळावी. (सोवळे पाळावे)

संपूर्ण दिवस देवतेचे स्मरण ठेवावे़ पारायणकाळात मौन पाळल्यास उत्तम़ पारायणाची जागा स्वच्छ, शुद्ध, मन प्रसन्न करणारी व शांत असावी़ ग्रंथ जमिनीवर ठेवू नये़ चौरंगावर वा पाटावर नवेकोरे रेशमी वस्त्र पसरून त्यावर ठेवावा़ पारायणकाळात ग्रंथ ठरल्या जागेवरून हलवू नये़ ग्रंथ वस्त्रात बांधून ठेवू नये़ समाप्तीच्या दिवशीही तो उघडाच ठेवावा़ पारायणासाठी पूर्वाभिमुख बसावे़ धूतवस्त्र परिधान करावे़ काळे वस्त्र नेसू नये़ अभक्ष्य भक्षण व अपेय पान वर्ज्य करावे़ कायिक, वाचिक आणि मानसिक शुद्धी राखावी़ पारायणकर्त्याने पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे़ आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे़ आहारावर नियंत्रण असावे़ साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये़ अशातऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील़

रोज सायंकाळी पोथी वाचन झाल्यावर धुपारती करावी.

पारायण पूर्ण वाचून झाल्यावर पोथीस नवीन वस्त्र व हार घालुन त्यांची गंध अक्षता वाहुन पुजा करावी महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात आपल्या सद्गुरूंना (पारायण केलेल्या देवतेला ) आवडणारे पदार्थ करावे आधी कुलदेवतेला नैवेद्य दाखवावा , इष्ट दैवतांना नैवेद्य दखवुन झाल्यावर आणखी एका नैवेद्याचे ताट गायीसाठी द्यावे व गणपती , दत्तत्रयांची, शंकराची व सद्‍गुरूंची आरती करावी. आरती झाल्यावर. नंतर साष्टांग नमस्कार करून पारायण काळामध्ये झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी व अशीच तुमची माझ्यावर सदैव कृपादॄष्टी असावी अशी प्रार्थना करावी.

उत्तर पूजा:[संपादन]

अक्षता आपल्या हृदयापाशी धरून आवाहन केलेल्या दैवतांना निरोप द्यावा. उत्तरपुजा करतेवेळी भक्‍तीपुर्वक अंतःकरणातून प्रथम दैवतांचे बोलवल्याप्रमाणे आल्याबद्दल आभार मानावेत व आपण जनकल्याणासाठी आपल्या स्थानांवर गमन करावे अशी प्रार्थना करावी अक्षता त्या विडयांवर व कलशांवर ‘’पुनरागमनायच’’ असे म्हणून वाहाव्यात. व त्या कलशातील पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीत सोडावे. नंतर हे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व संकल्पाचा नारळ त्वरित फोडून तो प्रसाद कुटूंबातील सर्वांनी ग्रहण करावा.

पारायण काळात पाळावयाचे नियम :[संपादन]

१) दिवसातून एकवेळ उपवास करावा. (त्या वेळेस उपवासाचे पदार्थ खावेत) व दुसऱ्या वेळेस वरण,भात पोळी भाजीचा नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावा.

२) पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत.

३) ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.

४) पारायणकर्त्याने गादीवर झोपू नये. पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे़ आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे़ आहारावर नियंत्रण असावे़ साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये़ अशातऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील़

५) पारायण काळात सोयर/सुतक आल्यास पारायण तेथेच थांबवून दूसऱ्या व्यक्‍तीकडून त्याचे विसर्जन करावे.

टीप : पोथीचे पारायण मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता करावे. हे पारायण स्त्रियांनीसुद्धा करायला हरकत नाही.

६) पारायणाची रोजची वेळ एकच असावी.

महत्त्वाचे माहीत नसलेले : पारायण पूर्ण झाल्यावर प्रथम अध्यायाच्या पाच किवां अकरा ओळी पुन्हा वाचाव्यात आणि मग समाप्ती करावी.