पाणी फाउंडेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पानी फाउंडेशन ही २०१६ मध्ये ना-नफा तत्त्वावर स्थापन झालेली संस्था. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते ह्या टीव्ही मालिकेच्या टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करायला हवेत, म्हणूनच, या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ह्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरवणे, हे पानी फाउंडेशनचे लक्ष्य आहे. पानी फाउंडेशन सध्या जलसंधारण (शास्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापन), नेतृत्वगुण आणि समाजबांधणी/संघटन या विषयांबाबत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ९०% दुष्काळी भागात पानी फाउंडेशनचे काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली प्रेरणा म्हणून २०१६ यावर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेची निर्मिती झाली. २०१९ या वर्षातली वॉटर कप स्पर्धा ८ एप्रिल ते २७ मे या कालावधीत घेण्यात आली.[१]

पाणी फाऊंडेशन (हिंदी: पानी फ़ाउंडेशन) ही महाराष्ट्र राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली ना–नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. पाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ (दिग्दर्शक : सत्यमेव जयते) आहेत. महाराष्ट्रातील बरीच गावे या स्पर्धेत उतरली आहेत.[२]पाणी फौंडेशन तर्फे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये काम चालू आहेत.

पानी फाउंडेशन चे टीम[संपादन]

 1. आमिर खान -संस्थापक
 2. किरण राव -संस्थापक
 3. सत्यजित भटकळ - सीईओ
 4. रीना दत्ता -सीओओ
 5. लॅन्सी फर्नांडिस -प्रशिक्षण प्रमुख
 6. डॉ. अविनाश पोळ -प्रमुख मार्गदर्शक
 7. सुरेश भाटिया -क्रिएटिव्ह डायरेक्टर
 8. ख्रिस्टोफर रेगो -क्रिएटिव्ह डायरेक्टर
 9. स्वाती चक्रवर्ती भटकळ -सोशल मिडिया प्रमुख [३]

संचालक मंडळ (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स)[संपादन]

 1. राजीव लुथ्रा
 2. आनंद देसाई
 3. बी. श्रीनिवास राव [४]

सत्यमेव जयते वॉटर कप[संपादन]

वॉटर कप स्पर्धेच्या या विलक्षण प्रवासात आमच्या हाती आल्या सामान्य लोकांच्या काही असामान्य कथा. आपला गाव पाणीदार करण्याच्या ध्यासाने गावकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना केला. पाणीस्वरुपात मिळालेल्या संपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप ही पानी फाउंडेशनतर्फे आयोजित केली जाणारी एक वार्षिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत, जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापन याबाबतीत सर्वोत्तम कामगिरी करण्याची चुरस गावकऱ्यांमध्ये लागलेली असते. सहा आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत पानी फाउंडेशन दरवर्षी, काही निवडक तालुक्यांमधील गावांना भाग घेण्यासाठी आमंत्रण देतात. जी गावे या स्पर्धेत भाग घेतात, ती गावे साधारण ३ ते ९ गावकऱ्यांची निवड करून पानी फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या चार दिवसीय सखोल प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवतात.[५]
या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना पाणलोट व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध माहिती मिळते, तसेच नेतृत्त्व आणि संघटन कौशल्येही शिकायला मिळतात. वॉटर कप स्पर्धेचे नियम आणि मूल्यांकन पद्धतीचा (मार्किंग सिस्टीम) सुद्धा परिचय करून दिला जातो. एकदा प्रशिक्षण पूर्ण झाले की, साधारणपणे संपूर्ण एप्रिल आणि मे महिनाभर पावसाळ्याच्या तयारीसाठी ही स्पर्धा सुरू होते. गावांमध्ये श्रमदानाद्वारे जलसंधारणासाठी आवश्यक पाणलोट रचना उभारल्या जातात, मशीनकामाच्या वापरासाठी पैसे उभे केले जातात, माती परीक्षण आणि माती उपचार केले जातात, पाण्याचा ताळेबंद (बजेट) तयार केला जातो. पाण्याच्या बचतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान अंमलात आणले जाते. पानी फाउंडेशन सहभागी स्पर्धकांना तांत्रिक मदत पुरवते आणि ही स्पर्धा संपल्यावर गावांनी केलेले काम १०० गुणांच्या धर्तीवर तपासले जाते.
२०१९ म्हणजेच यावर्षीच्या स्पर्धेत जिंकणाऱ्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रु., ५० लाख रु. आणि ४० लाख रु. एवढ्या घसघशीत रकमांची बक्षिसे मिळाली आणि प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट गावाला रु. १० लाख रकमेचे बक्षीस देण्यात आले.[६]

प्रशिक्षण[संपादन]

एखाद्या गावात झालेल्या पावसाची वार्षिक नोंद करून, त्यापैकी किती पाणी वाया गेले आणि किती आपण वाचवू शकतो याचीही नोंद ठेवणे.
शेततळी आणि समतल चर (कंटूर ट्रेन्च) यांसारख्या काही मूलभूत पाणलोट रचनांचे कार्य खास पाणलोट मॉडेलच्या (नमुना) आधारे समजून घेणे.
यशस्वीरीत्या पाणलोट व्यवस्थापन झालेल्या गावांना भेट देणे.
आपल्या गावाच्या नैसर्गिक, भौगोलिक रचनेला अनुकूल पाणलोट पद्धती अभ्यासाने समजून घेणे.
पाणलोट काम यशस्वी होण्यासाठी वृक्षारोपण आणि माती-परीक्षण यांसारख्या पूरक कामांची कार्यपद्धती देखील समजून घेणे.
नेतृत्वगुण, गटकृती/संघटन कौशल्य आणि पाण्याचे महत्त्व शिकवणारे खेळ खेळणे.
पानी फाउंडेशनचे अॅप सुलभतेने वापरणे.[७]

शालेय उपक्रम[संपादन]

समाजात एखादा बदल करायचा असेल तर मुलांच्या या अफाट दुनियेला आपलंस करणं गरजेचं आहे.हे लक्षात ठेवत पानी फाउंडेशनने ‘निसर्गाची धमाल शाळा’ याद्वारे माध्यमिक शाळेतील मुलांसाठी एक पर्यावरणावर आधारीत उपक्रम तयार केला. मानव आणि निसर्ग यांच्यातलं अविभाज्य नातं उलगडून दाखवणं हे या उपक्रमामागील मुख्य उद्दीष्ट आहे.
या निसर्गाच्या धमाल शाळेत परिक्षा नाहीत. केवळ खेळ, संगीत आणि फिल्म्स यांच्या माध्यमातून हसत खेळत मुलं पर्यावरणाविषयी काहीतरी खास शिकतात. एकेक तासांच्या सत्रांमध्ये आखलेला हा उपक्रम पर्यावरणावर मानवाच्या वागण्यामुळे होणाऱ्या परिणामांवर प्रश्न उपस्थित करतो. नैसर्गिक स्त्रोतांचा अमर्यादीत वापर यांच्याविषयी अधिक खोलात शिरण्याची संधी देतो. [८]
महाराष्ट्र शासनाच्या पाठींब्यामुळे जानेवारी – फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ तब्बल १,१७४ शाळा आणि ३८,००० पेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

प्रशिक्षण माहितीपट (फिल्म्स)[संपादन]

पाणलोट व्यवस्थापनाबद्दल विविधांगाने आणि सखोल माहिती देणारे अनेक मराठी माहितीपट पानी फाउंडेशनने तयार केले आहेत. ह्या माहितीपटांचा प्रशिक्षण देण्यासाठी वापर केला जातो.[९]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

http://www.esakal.com/agro/pani-foundation-24577

https://www.maayboli.com/node/58335

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pani-foundation-water-friend-campaign/articleshow/63419707.cms

 1. ^ "आमची मोहीम". https://www.paanifoundation.in. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 2. ^ "Paani Foundation - A people's movement to fight drought". Paani Foundation (en-US मजकूर). 2019-09-27 रोजी पाहिले. 
 3. ^ "आमची टीम". https://www.paanifoundation.in. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 4. ^ "बोर्ड ऑफ डायरेक्टर्स". https://www.paanifoundation.in. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 5. ^ "सत्यमेव जयते वॉटर कप". https://www.paanifoundation.in/mr/our-work/satyamev-jayate-water-cup/. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 6. ^ "सत्यमेव जयते वॉटर कप". https://www.paanifoundation.in/mr/our-work/satyamev-jayate-water-cup/. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 7. ^ "प्रशिक्षण कार्यक्रम". https://www.paanifoundation.in. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 8. ^ "शालेय उपक्रम". https://www.paanifoundation.in. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. 
 9. ^ "प्रशिक्षण माहितीपट (फिल्म्स)". https://www.paanifoundation.in. पानी फाउंडेशन. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.