पांढरा कुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

वनस्पतीशास्त्रीय नाव: १.Holarrhena pubescence Wall. २. Holarrhena antidysenterica
कुळ: करवीर कुळ (Apocynaceae)
नाम:- (सं.) कुटज; (हिं.) कुरेया; (बं.) कुर्ची; (काश्मिरी) कोर; (गु.) कडो; (ता)कुटचप्पालै; (ते.) काककोडिसे; (क.) कोरिसिगिन; (इं.) Conessi.


Holarrhena plant.jpg

वर्णन[संपादन]

पांढऱ्या कुड्याचे झुडुप किंवा लहान वृक्ष असतो. ही झुडुपे कोंकणात पुष्कळ असतात. यांस पांढऱ्या फुलांचे घोस येतात. फळ सुमारे हातभर लांब व बारीक शेंग असते. शेंगा जोडीने येतात, पण घोस नसतात. साल करड्या रंगाची व पोचट; मूळ वेडेवाकडे, खडबडीत व उदी रंगाचे, बिया जवासारख्या. पांढऱ्या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. बियांची चव कडू व जरा तुरट. औषधांत मुळाची साल व बिया वापरतात.

रसशास्त्र[संपादन]

पांढऱ्या कुड्याच्या सालींत एक फार कडू द्रव्य आहे. ते गुळवेलीच्या सत्त्वाप्रमाणे जमविता येते. हे पिठासारखे असून क्षारधर्मी आहे. हे अल्कोहोलमध्ये व पाण्यात सहज मिसळते. परंतु पाण्यात जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे.

धर्म[संपादन]

कुड्याची साल कोयनेलप्रमाणे कडू असते. ती दीपक, स्तंभक, वारंवार येणाऱ्या तापाला प्रतिबंध करणारी, व ताकद देणारी आहे.. बिया वायुहर असून, स्तंभक आणि ज्वरघ्नही आहेत. सालींत आणि बियांत रक्तसंग्राहक आणि वेदनाशामक आहेत. बिया भाजल्याने त्यांतील संग्राहक गुण वाढतो.

उपयोग[संपादन]

  1. कुडा हे एक अत्युत्तम औषध आहे. रक्ताची आव झाली असल्यास ह्याच्या मुळ्यांच्या सालीच्या तोडीचे दुसरे औषध नाही.
  2. कडू इंद्रजवाचे चूर्ण चिमटीभर रोज खाल्यास क्षुधा वाढते, अन्न जिरते, पोटात वायू धरत नाही व जंत असल्यास पडतात. ह्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी खाण्यास देतात, त्यामुळे जंत असले तर पडतात.
  3. पोटात बेंबीच्या आसपास जमा झालेला वायू व पोटशूळ यांसाठी इंद्रजव फार उत्तम औषध आहे. कुपचन रोगांत भाजलेल्या इंद्रजवाच्या काढ्याने उलटी बंद होते.
  4. दात दुखत असल्यास सालीच्या गरम गरम काढ्याने गुळण्या करतात. हिरड्यातून रक्त वाहणे व दांताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधी येणे ह्या रोगांत इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोळतात.
  5. जुनाट फुप्फुसाच्या रोगांत व दम्यांत इंद्रजव देतात. कुड्याच्या जून पानाच्या विड्या ओढल्यास किंवा इंद्रजव रोज खात राहिल्यास हिवताप येत नाही.
  6. इंद्रजवाच्या फांटाने मुळव्याधीत रक्त वाहणे बंद होते.
  7. यापासून बनविण्यात येणारे कुटजारिष्ट हे प्रभावी औषध आहे.

संदर्भ[संपादन]

औषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई