Jump to content

पद्मावती मंदिर (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पद्मावती या पानावरून पुनर्निर्देशित)

पद्मावती मंदिर पुण्याच्या दक्षिण भागात पुणे-सातारा रस्त्यावर आहे. हे एकेकाळचे सहलीचे ठिकाण असलेले हे देऊळ व परिसर अनेक दशके बदलेला नाही. येथे नवरात्रात आसपासच्या भागातील नागरिक बैलगाडीतून दर्शनास येत. येथे देवी तांदळा म्हणजे स्वयंभू शिळेच्या रूपात आहे. मंदिर छोटे आहे. देवीच्या मंदिराच्या मागे गणपती, मारुती व शंकराची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या आवारात पिंपळ व वडाचे मोठे वृक्ष आहेत.

पद्मावती ही बालाजीची (प्रभू व्यंकटेशाची) पत्‍नी समजली जाते.

इतिहास

[संपादन]

कोकणातून तांदूळ आणून विकणे व शेती करणे असे चरितार्थाचे साधन असलेल्या बिबवे कुटुंबीयांपैकी एकाला शेतात काम करत असताना बैलाच्या खुरास लागल्याने एक शिळा सापडली, तीच पद्मावती देवी झाली.

बिबवेवाडीतील बिबवे कुटुंबीयांची पद्मावती ही ग्रामदेवता आहे.

उत्सव

[संपादन]

पद्मावती येथे नवरात्र व पौषात मोठा उत्सव असतो. उत्सवात पूर्ण दिवस मंदिर दर्शनासाठी उघडे असते. पौष महिन्यात मोठी यात्रा असते. रोज डाळभात व पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो. दोन्ही उत्सवांत बिबवेवाडीतून सकाळी मंदिरात पालखी येते व त्या पालखीतून देवीची संध्याकाळी बिबवेवाडीपर्यंत मिरवणूक काढली जाते. दसऱ्याच्या दिवशी रात्री मंदिर बंद केले जाते ते कोजागिरी पौर्णिमेनंतर उघडते. मंदिरानजीक तळे असून त्याचे पाणी औषधी असल्याचा समज आहे. हे तळे पुणे महापालिकेच्या उद्यानात आहे.

पद्मावतीची पुण्यातील अन्य मंदिरे

[संपादन]

पुण्यात कोंढवा, कर्वेनगर, धायरी येथेही पद्मावतीची मंदिरे आहेत. कर्वेनगरमध्येही पद्मावतीदेवी स्वयंभू रूपात आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात पिरंगुटजवळ मुठा नावाचे गाव आहे. त्या गावात जननीदेवीचे मंदिर आहे. देवळातील दक्षिणेकडील मोठी मूर्ती जननीदेवीची आहे व शेजारची लहान मूर्ती पद्मावती देवीची आहे.

अन्य पद्मावत्या

[संपादन]
  • पद्मावती ही सिंहासन बत्तिशीमधील सिंहासनाला जोडलेल्या ३२ पुतळ्यांपैकी बारावी पुतळी होती.
  • पद्मावती नावाची यक्षिणी ही २३व्या जैन तीर्थंकरांची-पार्श्वनाथांची सेविका व संरक्षिका होती.
  • चितोडच्या प्रसिद्ध महाराणीचे नाव पद्मिनी ऊर्फ पद्मावती होते. ती सिंहल द्वीपचा राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावती यांची कन्या होती. तिचा विवाह चितोडचा राजा रतनसिंहाशी झाला होता.
  • तिरुपतीजवळ तिरुचुरा नवाच्या एका छोट्या गावात पद्मावतीचे एक सुरेख देऊळ आहे.
  • कारंजा गावातले चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर (पद्मावती देवीचे मंदिर)