Jump to content

पट्टेरी तरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पट्टेरी तरस (Striped Hyena) : याचे शास्त्रीय नाव हायना हायना (Hyena hyena) असे आहे. याच्या 'साायरिका (Hyena hyena syriaca), सुलताना (Hyena hyena sultana), . दुबाह (Hyena hyena dubbah) आणि हायना हायना हायना (Hyena hyena hyena) या पाच उपजाती आहेत. पैकी हायना हा. सायरिका आणि हायना हायना हायना  या जाती भारतात आढळतात.

या प्रजातीमध्ये नर व मादी दिसायला सारखेच असून नर मादीपेक्षा थोडा मोठा असतो. त्याची लांबी १००—१३० सेंमी., शेपटी २५—४० सेंमी. आणि खांद्यापासूनची उंची ६५—८० सेंमी. असते. नराचे वजन २६—४१ किग्रॅ. तर मादीचे २६—३४ किग्रॅ.पर्यंत असते. शरीरावरील केस (फर) करडसर व पिवळसर/तपकिरी रंगाची असून गळ्यावर काळ्या रंगाचा चट्टा असतो. शरीर व पायांवर काळ्या रंगाचे उभे पट्टे असतात. पट्टे उन्हाळ्यात अधिक उठावदार तर हिवाळ्यात फिकट होतात. रंग, शरीरावरील पट्टे आणि अंगावरील लांब केस अशा लक्षणांबाबत आर्डवुल्फशी त्याचे साम्य आहे. तो सर्वाहारी आहे. त्याच्या आहारात खरबूज व खारका असल्याने इझ्राएलमध्ये तो उपद्रवी प्राणी आहे.

पट्टेरी तरसामध्ये विणीचा हंगाम ठराविक नसतो. गर्भावधी ९०—९२ दिवसांचा असून मादीला    १—४ पिले होतात. जन्मत: ती आंधळी असतात. ७-८ दिवसांनी पिले डोळे उघडतात. पिलांचे दात तीन आठवड्यानंतर विकसित होतात. त्यांच्या शरीरावरील फर पांढरी-करडी असून त्यावर काळे पट्टे असतात. नर-मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात. आयुर्मर्यादा नैसर्गिक अधिवासामध्ये सुमारे १२ वर्षे आणि प्राणिसंग्रहालयात सुमारे २० वर्षे असते.