पटवर्धनी पंचांग
केरोपंती अथवा पटवर्धनी पंचांग हे दृक्प्रत्यय देणारे हिंदू मराठी पंचांग आह. हे पंचांग महाराष्ट्रात शके १७८७ पासून छापून प्रसिद्ध होऊ लागले. यात मुंबईचे अक्षांश आणि रेखांश प्रमाण म्हणून घेतले होते. सुप्रसिद्ध गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे हे याचे कर्ते असून आबासाहेब पटवर्धन हे प्रवर्तक होते. या पंचांगास आधी नवीन पंचाग हे नाव होते.
या केरोपंती पंचांगाचे गणित प्रथम काही वर्षे स्वतः केरोपंतांनी केले असावे. परंतु पुढे त्यांच्या देखरेखीखाली हे गणित वसई येथील आबा जोशी-मोघे हे करीत असत. शेवटी शेवटी केरोपंतांचे वंशज नीलकंठ विनायक छत्रे यांच्या देखरेखीखाली हे पंचांग बनत असे.
या पंचांगाच्या गणिताचा खर्च आबासाहेब पटवर्धन करीत. म्हणून शके १७९९ पासून पटवर्धनांच्या स्मरणार्थ ह्या पंचांगास पटवर्धनी पंचांग असे नांव ठेवण्यात आले. आबासाहेब यांस खगोलशास्त्राची आवड असल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने आकाशाचा वेध घेण्याचे साहित्य विकत घेतले होते.
शके १७९१ पासून १८११ पर्यंत रत्नागिरी येथील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन हरि आठले यांना केरोपंती पंचांगाचा अभिमान असल्यामुळे, ते स्वतःच्या खर्चाने ते पंचांग छापवीत. शके १८१२ पासून पुणे येथील चित्रशाळेचे मालक वासूकाका जोशी हे पंचांग छापू लागले. स्वखर्चाने छापले गेल्याने या पंचांगाचे प्रकाशन चालू राहिले.
त्या काळच्या इतर पंचांगांहून केरोपंती पंचांग वेगळे होते. या पंचांगाच्या गणितासाठी रेवती नक्षत्रातला मुख्य तारा हा शके ४९६ मध्ये संपाती होता असे मानले होते.. म्हणून त्या वर्षी अयनांश शून्य मानून गणित केले जात असे.
या पंचांगात दाखविलेली ग्रहस्थिती प्रत्यक्षात जवळपास तशीच दिसे. म्हणून हे पंचांग दृक्प्रत्यय देणारे पंचांग म्हणून ओळखले जाई.