Jump to content

पक्ष्यांचे स्थलांतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पक्ष्यांचे स्थलांतर ही पक्षिजीवनामधली एक विलक्षण घटना आहे. पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात. सदा सर्वकाळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसतिस्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर अशी व्याख्या लॅण्ड्सबरो थॉम्सन या शास्त्रज्ञाने केली आहे.पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास करतात.हा पक्षी वर्षात किती किलोमीटरचा प्रवास करतो.

चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वांत मोठे स्थलांतर करतो. तो उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव व परत उत्तर ध्रुव असा जवळ जवळ ३६,००० कि.मी.चा प्रवास एका वर्षात करतो.

सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. त्यामधे थापट्या नकटा, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल,तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे गूज येतात. चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव,उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षीही येतात. तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हारिण, तीसा, श्येन कुकरी, खरुची हे शिकारी पक्षीही येतात.

पक्ष्यांच्या स्थलांतराची कारणे -उत्तर गोलार्धात हिवाळ्यात निर्माण होणारा खाद्याचा तुटवडा हे तेथील पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रमुख कारण असते असे काही पक्षिशास्त्रज्ञांचे मत आहे. अलीकडील संशोधनातून असे सूचित होते की पक्ष्यांच्या स्थलांतराला दिवसाच्या कालावधीतील बदल कारणीभूत होतो. दिवस जसा लहान अथवा मोठा होतो तसा त्याचा पक्ष्यांच्या शरीरातील पीयूष (Pituitary) आणि पिनीअल (Pinneal) ग्रंथींवर परिणाम होतो. त्यामुळे पक्षी अस्वस्थ होतात आणि योग्य वेळ आली की स्थलांतराचा प्रवास सुरू करतात.

पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रमुख हवाई मार्ग - अ) निओ आर्क्टिक - निओ ट्रॉपिकल हवाई मार्ग - पक्ष्यांचे स्थलांतर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान होते.

ब) युरेशियन - आफ्रिकन हवाई मार्ग - युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांच्या दरम्यान होणारे स्थलांतर.

क) ऑस्ट्रेलियन हवाई मार्ग - दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान होणारे स्थलांतर

ड) पेलॅजिक हवाई मार्ग - समुद्रावर होणारे स्थलांतर

भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो.भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा इशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.