पंधरा मोटांची विहीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंधरा मोटेची विहीर साताऱ्याजवळच्या लिंब नावाच्या एका छोट्या गावातील ऐतिहासिक व कलात्मक विहीर आहे.

कसे जावे?[संपादन]

पुण्याहून साताऱ्याकडे जाताना साताऱ्याच्या अलीकडे १३ किलोमीटरवर नागेवाडी नावाचे गाव आहे. या थांब्यावरूनच लिंब गावासाठी फाटा फुटतो. दोन किलोमीटरचे हे अंतर आहे. साताऱ्याहून या गावापर्यंत एस.टी. बसही येते. या गावाची ओळख लिंब गोवे अशी आहे. कृष्णेच्या काठावरील या गावात पेशवेकालीन मंदिरे, नदीकाठचे घाट असे बरेच काही पाहण्यासारखे आहे. या गावचा कृष्णामाईचा उत्सवही मोठा असतो. पण या गावात 'पंधरा मोटेची विहीर' हे एक विलक्षण असे स्थळ दडलेले आहे.

निर्मिती[संपादन]

सातारच्या छत्रपतींनी ही जागा फुलवली, आमराई निर्माण केली आणि मग अशा या राईतच त्यांनी या साऱ्यांसाठी म्हणून एक विहीरही खोदली.

जलमंदिर आणि विहीर[संपादन]

वृक्षांची सावलीतून चालत चालत आल्यावर समोर एक जलमदिर दिसते. तेथे शिवपिंडीच्या आकाराची एक छोटी विहीर, पाठीमागे अष्टकोनी मुख्य विहीर, त्याला जोडूनच पुढे चौकोनी भाग आणि त्याही पुढे निमुळत्या झालेल्या भागातून पायऱ्यांचा मार्ग अशी ही या पंधरा मोटेच्या विहिरीची रचना आहे. या विहिराला पायऱ्या, पूल, कमानी, सज्जा, मंडप, खोल्या, कोरीव खांब, त्यावर शिल्पांकन, शिलालेख, मोटांचे धक्के, पाणी जाण्यासाठी दगडी पन्हाळी आणि मुख्य म्हणजे या साऱ्यांच्या सोबतीला स्वच्छ-नितळ पाणी आहे.

शिलालेख[संपादन]

या विहिरीला तळाशी एक मोठा दरवाजा व कमान आहे. कमानीच्या वरती एक आडवा शिलालेख आहे. शिलालेखावरून समजते की, सातारच्या गादीचे संस्थापक शाहूमहाराज यांच्या राणीसाहेब श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब यांनी शके १६४१ ते १६४६ म्हणजेच इसवी सन १७१९ ते १७२४ या दरम्यान ही सुंदर विहीर आकारास आणली. या दरवाजावर या लेखाशिवाय कमळ, चक्र, मध्यभागी पोपटासारखा पक्षी कोरलेला आहे. मागच्या बाजूस दोन्ही हातास शरभाची शिल्पे आहेत. शिवाय वाघ, कुत्रा, मगर अशा अनेक प्राण्यांचे एकत्रित चित्र आहे.

महालाचा रस्ता[संपादन]

कमानीच्या दरवाज्यातून आत पाय ठेवल्यावर विहिरीपुढचा चौकोनी भाग (चौक) लागतो. या भागावरही पाणी असल्याने विहिरीच्या पुढच्या भागात जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधलेला आहे. हा चौक आणि पुढील विहीर या दरम्यान एक जाडजूड विहिरीच्या उंचीची भिंत आहे. या भिंतीतच एका महालाची रचना केलेली आहे. या महालात जाण्यासाठी या चौकापुढील कमानी खालून एक जिना आहे. तसे विहिरीच्या वरच्या बाजूनेदेखील एक रस्ता आहे. बऱ्याच वेळा विहिरीचे पाणी या पुलावरही येत असल्याने वरच्या मार्गानेच या महालात उतरावे लागत.

महाल[संपादन]

महाल म्हणजे विहिरीच्या मधोमध असलेला आणि एकूण सोळा खांबांवर आधारलेला एक मंडप आहे. यातील मधले दोन खांब स्वतंत्र आहेत. बाकीचे भोवतीच्या भिंती, कमानींमध्ये सामावलेले आहेत. या खांबांवर पुन्हा शिल्प-नक्षीकाम. गणपती, हनुमान, गोपिकांसह मुरलीधर, कुस्ती खेळणारे मल्ल, घोडेस्वार, हत्तीस्वार, पक्ष्यांच्या जोडय़ा, मोत्यांची माळ घेतलेला हंस अशी ही शिल्पे आहेत. शिवाय विविध भौमितिक आकृत्यांची नक्षी, कमळे, चक्रही कोरलेली. खांबांच्या शिरोभागी काही ठिकाणी छताचा भार सावरल्याचा भाव दाखवणारे यक्ष, छताच्या मध्यभागी उमलती कमळे, असे बरेच काही आहे. कधी काळी हा सारा महाल रंगवलेला होता. त्याचे अवशेष आजही दिसतात.

गवाक्षे[संपादन]

महालाच्या या खांबांना रेखीव दगडी कमानींची गवाक्षे आहेत. या गवाक्षांतून बाहेर डोकावण्यासाठी दोन्ही बाजूस सज्जे ठेवलेले आहेत. या सज्जातून विहिरीत डोकवावे तो मुख्य विहिरीचे रेखीव बांधकाम समोर येते. या बांधकामावर पुन्हा जागोजागी शरभ, व्याल अशी शिल्पें विसावलेली आहेत. तीन माशांचे एकत्रित असेही एक शिल्प आहे. विहिरीच्या प्रत्येक कोनावर पुन्हा एकेक नागशिल्प आहे.

मोटा[संपादन]

११० फूट खोल आणि पन्नास फूट व्यासाच्या या विहिरीतून पंधरा ठिकाणी पाणी वर उपसण्यायाठी मोटेची सोय केलेली आहे. या मोटांच्या दगडी तोट्या आजही शाबूत आहेत. हे सारे बांधकाम ज्यातून केले त्या चुन्याच्या घाणीची दगडी चाकेही इथेच रुतून बसलेली आहेत.