नेरुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नेरुर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावात ३२ वाडया आहेत. येथे मालवणी भाषा (मराठीतील एक बोलीभाषा) बोलली जाते. नेरुरमध्ये श्री देव कलेश्वर, श्री गावडोबा, श्री भुतनाथ रवळनाथ अशी अनेक मंदिरे आहेत. श्री देव कलेश्वर हे येथील प्रमुख मंदिर. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे बरीच मोठी जत्रा भरते. श्री देव कलेश्वराचा रथ हे या जत्रेचे प्रमुख आकर्षण असते. पूर्ण जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येथे येतात.

नेरुरकर, गावडे, राऊत, परब, देसाई, प्रभु ही ह्या गावातील प्रमुख आडनावे आहेत. चवाठा, जकात, नेरुरपार ह्या गावातील काही महत्त्वाच्या वाडया. नेरुरपार येथील नदीवरील पुलामुळे कुडाळ आणि मालवणमधील अंतर कमी झाले. त्यामुळे नेरुरला वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्व आले आहे. वालावल, भोगवे, काळसे, पिंगुळी, कोरजाई, पाट, परुळे ही नेरुरजवळील काही गावे आहेत.