नितीन करमाळकर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डॉ. नितीन रघुनाथ करमाळकर (जन्म : कणकवली, ११ जानेवारी १९६२) हे पुणे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू आहेत. त्यांनी १८ मे २०१७ रोजी या पदाचा कार्यभाग स्वीकारला. ते यापूर्वी २५ वर्षे याच विद्यापीठात अध्यापनाचे काम करीत होते. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, विद्यापरिषद, अधिसभा आदी मंडळांवर व समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
शिक्षण
[संपादन]मूळ कणकवलीचे असलेले डॉ. करमळकर यांनी कोल्हापूर विद्यापीठातून बी.एस्सी. त्यानंतर ते पुणेकर झाले आणि त्यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्रात एम.एस्सी. व भूरसायनशस्त्रात पीएच.डी. केली.
पुणे विद्यापीठातील कारकीर्द
[संपादन]करमाळकर पुणे विद्यापीठात इ.स. १९८८मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यापीठात भूशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत काम पाहिले. विद्यापीठातील अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्याही पेलल्या आहेत. विद्यापीठाच्या ‘अंतर्गत गुणवत्ता हमी समिती (इंटर्नल क्वॉलिटी अॅश्युरन्स सेल)’चे प्रमुख म्हणून ते २०११ पासून काम पाहत होते. विद्यापीठाच्या अधिसभेचे, परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. २०१७ साली पुणे विद्यापीठाला मिळालेली ‘नॅक’ची अ + श्रेणी, राष्ट्रीय मूल्यांकन प्रणालीत स्थान मिळण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
संशोधन
[संपादन]पर्यावरण, भूशास्त्र, भूरसायनशास्त्र हे करमाळकरांच्या अभ्यासाचे विषय आहेत. दगडांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध नियतकालिकांमधून त्यांचे ३५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सध्या १० राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध प्रकल्पांसाठी ते काम करत आहेत. करमाळकरांचे संशोधन हे प्रामुख्याने अग्निजन्य खडकांविषयी व हिमालयातील विशिष्ट खडकांविषयी आहे. भारतात कलकत्ता, विदेशांत ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स येथील संस्थांबरोबर त्यांचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. कच्छ, लडाख, हिमालय पर्वतरांगा, दख्खनचे ज्वालामुखीय पठारावरील दगड यांवर त्यांचे संशोधन आहे.
कच्छमधील भूखनिजांवरील संशोधनासाठी डॉ. नितीन करमाळकरांना ‘मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’कडून भूशास्त्रातील मानाचे ‘प्राध्यापक सी. नागण्णा सुवर्णपदक’ मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ पासून पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे, तर २०१७ साली पाच विद्यार्थी संशोधन करत आहेत.
बंगलोरच्या ‘जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे ते सदस्य आहेत.
पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख
[संपादन]करमाळकरांकडे, इ.स. २०१३ पासून २०१७ पर्यंत पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती. पर्यावरणशास्त्रावरील त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पर्यावरण अहवाल तयार करणे, ऊर्जा प्रकल्प, धरणे यांच्या निर्मिती आणि देखभालीसाठी ते मार्गदर्शक म्हणूनही काम पाहत.