निकिता ख्रुश्चेव्ह
निकिता ख्रुश्चेव्ह Никита Хрущёв | |
सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस
| |
कार्यकाळ १४ सप्टेंबर १९५३ – १४ ऑक्टोबर १९६४ | |
मागील | ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव |
---|---|
पुढील | लिओनिद ब्रेझनेव |
सोव्हियेत संघाच्या मंत्रीमंडळाचा अध्यक्ष
| |
कार्यकाळ २७ मार्च १९५८ – १४ ऑक्टोबर १९६४ | |
मागील | निकोलाय बुल्गानिन |
पुढील | अलेक्सेइ कोसिजिन |
जन्म | १५ एप्रिल १८९४ कालिनोव्का, रशियन साम्राज्य |
मृत्यु | ११ सप्टेंबर, १९७१ (वय ७७) मॉस्को, रशियन सोसाग, सोव्हिएत संघ |
पत्नी | नीना ख्रुश्चेव्हा |
सही |
निकिता ख्रुश्चेव्ह (रशियन: Никита Сергеевич Хрущёв; १५ एप्रिल १८९४ - ११ सप्टेंबर १९७१) हा एक सोव्हिएत राजकारणी व सप्टेंबर १९५३ ते ऑक्टोबर १९६४ दरम्यान देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता. जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने सोव्हिएतचे नेतृत्व केले व देशामध्ये स्टॅलिनची धोरणे बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान ख्रुश्चेव्ह सोव्हिएत मंत्रीमंडळाच्या अध्यक्षपदावर होता.
ख्रुश्चेव्हचा जन्म रशिया व युक्रेनच्या सीमेजवळील एका लहान गावामध्ये झाला. तरुण वयामध्ये तो एक कुशल लोहार होता. रशियन यादवी युद्धानंतर ख्रुश्चेव्ह राजकारणात शिरला व हळूहळू कम्युनिस्ट पक्षामध्ये वरच्या पदांवर पोचू लागला. १९३० च्या दशकातील स्टॅलिनने हाती घेतलेल्या राजकीय अटकांना व हिंसाचाराला ख्रुश्चेव्हचा पाठिंबा होता. १९३९ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला युक्रेनमधील सत्ता सांभाळण्यासाठी पाठवले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लाल सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या ख्रुश्चेव्हकडे क्यीववरील नाझी जर्मनीचे आक्रमण थोपवून धरण्याची जबाबदारी होती. १९४२ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला स्टालिनग्राड शहराच्या बचावासाठी रवाना केले. युद्ध संपल्यानंतर ख्रुश्चेव्ह पुन्हा युक्रेनमध्ये परतला व त्याच्या नेतृत्वाखाली युक्रेन सोसागमध्ये पुन्हा शांतीचे व भरभराटीचे दिवस परतले. स्टॅलिनच्या अखेरच्या काळात ख्रुश्चेव्ह मॉस्कोमध्ये दाखल झाला. ६ मार्च १९५३ रोजी स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली ज्यामध्ये ख्रुश्चेव्हचा विजय झाला व तो पक्षाचा सरचिटणीस व पर्यायाने देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख बनला.
ख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने मोठ्या प्रमाणावर अंतराळ संशोधन हाती घेतले व लष्करावरील खर्चात कपात केली. ख्रुश्चेव्हने कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले परंतु जे अयशस्वी ठरले. त्याच्या कारकिर्दीमध्ये शीत युद्ध शिगेला पोचले. क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणीदरम्यान सोव्हिएत व अमेरिकेमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ ऑक्टोबर १९६४ रोजी कम्युनिस्ट पक्षाने ख्रुश्चेव्हला सरचिटणीस पदावरून काढले व त्याला राजकीय निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. अखेरच्या काळात ख्रुश्चेव्हचे दिवस मानसिक नैराश्यामध्ये गेले व ११ सप्टेंबर १९७१ रोजी तो मॉस्कोमधील एका इस्पितळामध्ये हृदयाघाताच्या धक्क्याने मृत्यू पावला.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |