नाविक (दिक्चालन यंत्रणा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाविक या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताची प्रादेशिक उपग्रह दिक् चालन पद्धति (नाविक) ही भारताची उपग्रहांच्या साह्याने संचालित होणारी दिक् चालन यंत्रणा आहे. नाविक (NavIC) या नावाने ती प्रचलित आहे. अनेक भारतीय भाषांत नाविक या शब्दाचा अर्थ नावाडी असा होतो.

ही यंत्रणा उभारणीच्या टप्प्यात आहे. ही यंत्रणा नेमकी वास्तवकालीन स्थिती आणि वेळेविषयी माहिती पुरवू शकेल, ही स्वायत्त उपग्रह दिक् चालन यंत्रणा भारताचा संपूर्ण भूभाग आणि त्याच्याभोवतीच्या १५०० किलोमीटर परिसर एवढ्या क्षेत्रात वापरता येईल. भविष्यकाळात हा परीघ आणखी वाढवण्याची योजना आहे. नागरी आणि लष्करी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी या व्यवस्थेचा वापर करण्याची योजना आहे.

सद्यस्थितीत सात उपग्रहांचा समुह त्यासाठी वापरला जाणार असून त्यासाठीचा सातवा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थापित करण्यात आला. आयआरएनएसएस-१ (इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम -१) या आद्याक्षरांनी ही उपग्रह मालिका ओळखली जाते.

सध्या जगात अनेक देशांच्या अशा उपग्रह दिक् चालन पद्धती अस्तित्वात आहेत. अमेरिकेची जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) ही त्यापैकीच एक आहे.