धनादेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनादेश हा एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बँक किंवा इतर वित्तसंस्थेला दिलेला लेखी आदेश होय.

साधारणपणे धनादेश हा बँक किंवा वित्तसंस्थेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश सहसा विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या बँकेने पुरवलेल्या छापील नमुना-कागदावर लिहिला जातो.

कागद[संपादन]

अनेक देशांमध्ये धनादेश लिहिण्याच्या कागदाबद्दलचे संकेत आहेत. असे असताही वित्तसंस्थेने मान्य केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कागदावर धनादेश लिहिला जातो. भारतातील धनादेश लिहिण्याच्या कागदाचे संकेत असे आहेत -

  • धनादेश हा बँकेने पुरवलेल्या छापील फाॅर्मवरच लिहावा.
  • कागदावर पुढच्या किंवा मागच्या बाजूला कार्बनचे मुक्त कण नसावेत.
  • कागद अतिनील किरणनिष्क्रिय असावा, म्हणजे तो अतिनील किरणांमध्ये धरला तर चमकत नाही.
  • कागद बहुधा ९५ जीएसएम (ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर) प्रकारचा बाँड पेपर असतो. अशा एक चौरस मीटर कागदाचे वजन ९५ ग्रॅम असते. याच प्रकारचा कागद, करारनामा लिहिण्यासाठीही वापरला जातो. १०० जीएसएम कागद सुद्धा प्रचलित आहे.
  • कागदावर लिहिलेला मजकूर खोडरबराने, ॲसिडने, अल्कलीने, ब्लीचिंग एजंटने किंवा अन्य संद्रिय-असेंद्रिय रसायनाने पुसून बदलता येत नाही.

आकार व आकारमान[संपादन]

  • धनादेश हा आयताकृती असतो.
  • भारतीय रिझर्व बँकेने सूचित केल्याप्रमाणे धनादेशाची लांबी ८.० ± ०.२ इंच (सुमारे २०२ मिलिमीटर) आणि रुंदी ३.६६ ± ०.२ इंच (सुमारे ९२ मिलिमीटर) असते. कर्णाची लांबी ८.८ ± ०.२ इंच (सुमारे २२० मिमी) असते. धनादेशाच्या तळाशी असलेल्या आडव्या पांढऱ्या एमआयसीआर पट्टीची रुंदी (उंची) ०.५ ± ०.२ इंच (सुमारे १३ मिमी) असते. धनादेशाची रक्कम अंकामध्ये लिहिण्यासाठी असलेला आयत १.५५ X ०.३४ इंच (सुमारे ३९ X ८.५ मिमी) आकारमानाचा असतो.

शाई[संपादन]

धनादेशावर चुंबकीय शाईने बँकेचा कोड नंबर, चेकचा अनुक्रमांक, ग्राहकाचा खातेक्रमांक व इतर माहिती छापलेली असते.. मॅग्नॅटिक इंक कॅरॅक्टर रेकग्निशन द्वारे असा मजकूर यंत्राद्वारे वाचला जाऊ शकतो.