दुर्गा सप्तशती

दुर्गा सप्तशती किंवा देवी माहात्म्यम् किंवा शत चंडी किंवा चंडी पाठ हे देवीच्या उपासनेशी संबंधित ७०० श्लोकांचे स्तोत्र आहे जे महादेवीचे वर्णन करतात. हे मार्कंडेय पुराणाचा भाग आहे.[१][२]
देवी-भागवत पुराण आणि देवी उपनिषद यांच्यासह हे शाक्त पंथतील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे. हा ग्रंथ हिंदू परंपरेतील सर्वात जुन्या पूर्ण हस्तलिखितांपैकी एक आहे ज्यामध्ये देवाच्या स्त्रीत्वाच्या श्रद्धेचे आणि उपासनेचे वर्णन केले आहे.[३]
या ग्रंथात १३ अध्यायांमध्ये ७०० श्लोकांची मांडणी करण्यात आली आहे. त्यात चांगल्या आणि वाईटाच्या एका ऐतिहासिक लढाईचे वर्णन केले आहे, जिथे देवी दुर्गा म्हणून प्रकट झालेली आहे व चांगल्या शक्तींचे नेतृत्व करत ती राक्षस महिषासुर विरुद्ध लडते. इथे देवी खूप क्रोधी आणि निर्दयी आहे आणि चांगल्या शक्तींचा विजय होतो. या कथेतील श्लोक एक तात्विक पाया देखील दर्शवितात जिथे अंतिम वास्तव (हिंदू धर्मातील ब्रह्मन्) देखील स्त्री असू शकते. नवरात्री उत्सव, दुर्गापूजा उत्सव आणि भारतातील दुर्गा मंदिरांमध्ये हे पठण केले जाते.[४]
इतिहास
[संपादन]देवी महात्म्यम् हा मार्कंडेय पुराणातून घेतलेला मजकूर आहे आणि तो नंतरच्या अध्याय ८१ ते ९३ मध्ये आहे. हे पुराण इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील आहे, आणि देवी महात्म्यम् हे मार्कंडेय पुराणात ५ व्या किंवा ६ व्या शतकात जोडले गेले.
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील जयल तहसीलमधील गोथ गावातील मंदिरातील दधीमती माता शिलालेख (इ.स. ६०८) देवी महात्म्यातील काही भाग उद्धृत करतो. अशाप्रकारे, असा निष्कर्ष काढता येतो की हा मजकूर ७ व्या शतकापूर्वी रचला गेला होता.[५] तो साधारणपणे ४००-६०० इ.स. दरम्यानचा आहे.[६] अमेरिकी भारतशास्त्रज्ञ वेंडी डोनिगरनुसार देवी महात्म्य सुमारे ५५० इ.स. आणि उर्वरित मार्कंडेय पुराण सुमारे २५० इ.स. मधील आहे.[७]
वर्ण्य विषय
[संपादन]
दुर्गा सप्तशती ग्रंथात देवीचे हे महात्म्य, पराक्रम आणि ईश्वरीय स्वरूप यांचे वर्णन करण्यात आलेले आहे.[८][९] हे पुस्तक तीन असमान प्रकरणांमध्ये विभागले गेले आहे. देवी महात्म्याच्या कथेची रचना एका हद्दपार झालेल्या राजा सुरथाची आहे, ज्याने आपले राज्य गमावले आहे आणि समाधी नावाच्या व्यापाऱ्याची, ज्याचा त्याच्या कुटुंबाने विश्वासघात केला आहे. या घटनांमुळे अस्वस्थ होऊन, दोघेही जगाचा त्याग करून शांती मिळविण्यासाठी मेधा ऋषींच्या जंगली आश्रमात जाण्याचा निर्णय घेतात. मेधाच्या शिकवणी त्यांना दोघांनाही अस्तित्वाच्या दुःखाच्या पलीकडे घेऊन जातात. ऋषी त्यांना महामायाबद्दल सांगतात, जी देवीची एक उपमा आहे, जी जगाच्या भ्रमाचे आणि निर्मितीचे कारण आहे आणि जी वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते.
पहिले प्रकरण
[संपादन]देवी महात्म्यमच्या पहिल्या भागात (अध्याय १) देवीला महा-माया या स्वरूपात दाखवले आहे. येथे, देवी महा-माया म्हणून सृष्टीची मध्यवर्ती आणि गुरुकिल्ली आहे, किंवा विश्वाच्या प्रकटीकरणापूर्वी वैश्विक महासागराच्या पाण्यात विष्णूला गाढ झोपेत आणणारी महान भ्रम/शक्ती आहे. विष्णूच्या कानाच्या मेळातून मधु-कैटभ हे दोन राक्षस उद्भवतात. ब्रह्मांडाचे पुढील चक्र निर्माण करण्याची तयारी करणाऱ्या ब्रह्मदेवाला पराभूत करण्याचा प्रयत्न राक्षस करतात. ब्रह्मा महान देवीला साकडे घालतो, तिला विष्णूपासून दूर जाण्यास सांगतो जेणेकरून तो जागृत होउन राक्षसांचा वध करू शकेल. देवी माघार घेण्यास सहमत होते आणि विष्णू जागृत होतात; पाच हजार वर्षे राक्षसांशी लढतात आणि त्यांचा पराभव करतात. येथे देवीची प्रशंसा अशी केली आहे की ती दोन्ही विश्वव्यवस्था अस्वस्थ आणि पुनर्संचयित करण्यास मदत करणारी आहे.[१०]
दुसरे प्रकरण
[संपादन]दुसऱ्या भागात (अध्याय २-४) देवीला तिच्या अवतारात दुर्गा म्हणून दाखवले आहे. या भागात आकार बदलणाऱ्या महिषासुराच्या आक्रमणाखाली जग दाखवले आहे. महिषासुर आपल्या शक्तींचा वापर करून नर देवांना पराभूत करू शकतो कारण त्याला असे वरदान मिळाले होते की त्याला फक्त एका स्त्रीनेच पराभूत केले जाऊ शकते. क्रोधित आणि असहाय्य होऊन, देव ऊर्जा सोडतात जी प्रकाश आणि शक्तीच्या एका अनोख्या समूहात एकत्रित होते जी देवी दुर्गेचे रूप धारण करते. त्यानंतर देव तिला विविध शस्त्रे देतात. विष्णू तिला त्याचे चक्र देते, वायु तिला त्याचे धनुष्य आणि बाण देते आणि हिमालय तिला वाहन म्हणून सिंह प्रदान करतो. दुर्गा युद्धात सिंहावर स्वार होते आणि म्हशीच्या राक्षसाचे डोके कापून त्याला पकडते आणि मारते, ज्यामुळे जगात सुव्यवस्था निर्माण होते.[११][१२][१३]
तिसरे प्रकरण
[संपादन]शेवटच्या भागात (अध्याय ५-१३) शुंभ-निशुंभ हे राक्षस स्वर्ग जिंकतात आणि अर्व देव देवीची प्रार्थना करण्यासाठी हिमालयात जातात. लवकरच, पार्वती येते आणि त्यांना ती देवी असल्याचे प्रकट करते. त्यानंतर, अंबिका किंवा कौशिकी, पार्वतीच्या शरीराच्या कोशातून प्रकट होतात. देवी शुंभ-निशुंभाचे सेवक चंद-मुंड सोबत भयंकर युद्धात सहभागी होते. चंद-मुंड अखेर देवीच्या कपाळातून बाहेर पडणाऱ्या कालीकडून मारले जातात. युद्ध सुरूच राहते आणि सात पुरुष देवांपासून सात माता किंवा सप्तमातृका निर्माण होतात. रक्तबीज हा राक्षस देखील प्रकट होतो आणि कालीकडून मारला जातो. निशुंभ आणि त्याच्या सैन्याचा मातृकांच्या मदतीने देवी पराभव करते. शुंभाविरुद्धच्या अंतिम युद्धात, देवी एकटी लढा देते.[११]
युद्धानंतर, सर्व देव देवीची स्तुती करतात. हे स्तोत्र नारायणी स्तुती म्हणून ओळखले जाते जे विश्वाच्या निर्मात्या, संरक्षक आणि संहारक म्हणून तिच्या भूमिकेची पुष्टी करते. देवांवर प्रसन्न होऊन देवी त्यांना वरदान देते की ती नेहमीच राक्षसांचा नाश करेल आणि पृथ्वीवर शांती आणेल. ती तिच्या भविष्यातील अवतारांचा आणि त्यांच्या संबंधित कृत्यांचा उल्लेख करते (अध्याय ११). नंतर देवी तिच्या उपासनेचे फायदे, शांती प्राप्ती, आनंदाचा उल्लेख करते आणि अदृश्य होते (अध्याय १२).[१४]
मेधा ऋषी कथा संपवतात. ते राजा आणि व्यापाऱ्याला त्यांच्या भ्रमातून मुक्त होण्यासाठी देवीचा आश्रय घेण्यास सांगतात. राजा आणि व्यापारी दोघेही तपश्चर्या करतात आणि देवी त्यांना तिचे दर्शन देते. राजा देवीकडे त्याचे हरवलेले राज्य मागतो आणि देवी त्याला ते देते. व्यापारी देवीकडे बुद्धी मागतो आणि ती त्याला ते देते (अध्याय १३).[१५]
संदर्भ
[संपादन]- ^ पाण्डेय, डॉ लक्ष्मीकान्त; Pandey, Dr Laxmi Kant (2016-06-28). श्रीदुर्गासप्तशती (दोहा-चौपाई): SriDurgaSaptShati (Hindi Sahitya) (हिंदी भाषेत). Bhartiya Sahitya Inc. ISBN 9781613015889.
- ^ "Chandi Path". Archive.org. 2020-02-17. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ Constance Jones; James Ryan (2014). Encyclopedia of Hinduism. Infobase Publishing. p. 399. ISBN 978-0816054589.
- ^ Gavin Flood (1996). An Introduction to Hinduism. Cambridge University Press. p. 181. ISBN 978-0-521-43878-0.
- ^ Pandit Ram Karna Asopa (1911). "Dadhimati-Mata Inscription of Dhruhlana". In E. Hultzsch (ed.). Epigraphia Indica. XI. Government of India. p. 302.
- ^ Katherine Anne Harper (1 February 2012). "The Warring Śaktis: A Paradigm for Gupta Conquests". The Roots of Tantra. SUNY Press. p. 117. ISBN 978-0-7914-8890-4.
- ^ Charles Dillard Collins (1988). The Iconography and Ritual of Siva at Elephanta: On Life, Illumination, and Being. SUNY Press. p. 36. ISBN 978-0-88706-773-0.
- ^ कल्याणी, अपर्णा (२००७). श्रीदुर्गासप्तशती उपासना. मथुराबाई दमाणी ट्रस्ट, सोलापूर. pp. १७.
- ^ Mittal, Sushil; Thursby, Gene, eds. (2007). The Hindu world. Routledge worlds (1 ed.). New York: Routledge. pp. 148–151. ISBN 978-0-415-77227-3.
- ^ "Devi". 2007-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-10-14 रोजी पाहिले.
- ^ a b "Devi". 2007-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-10-14 रोजी पाहिले.
- ^ Laura Amazzone (2012). Goddess Durga and Sacred Female Power. University Press of America. pp. 5–10. ISBN 978-0-7618-5314-5.
- ^ Thomas B. Coburn (23 April 1991). "3. The Text in Translation". Encountering the Goddess: A Translation of the Devi-Mahatmya and a Study of Its Interpretation. State University of New York Press. pp. 29–86 (Complete translation). ISBN 978-0-7914-9931-3.
- ^ Swami Sivananda, Devi Māhātmya (with a lucid running translation), The Divine Life Society, p.122-130
- ^ Swami Sivananda, Devi Māhātmya (with a lucid running translation), The Divine Life Society, p.134-135