Jump to content

दाभोळकरचे भूत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दाभोलकरांचे भूत हे श्याम पेठकर यांनी लिहिलेले एक मराठी नाटक आहे. वैदर्भीय कलावंतांनी बसवलेले हे नाटक हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केले होते. या नाटकाची निर्मिती समीर पंडित यांची होती.

सेन्सॉरने अडवले

[संपादन]

नाटक परिनिरीक्षण मंडळाने 'दाभोळकरचे भूत' या नावालाच आक्षेप घेत असंख्य कट सुचवून नाटकाला परवानगी नाकारण्यात आली होती.[]

एका सदस्याचा विरोध

[संपादन]

सहापैकी एका सदस्याच्या आक्षेपावरून हे नाटक रोखून ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांनी २५ जुलै २०१४ रोजी पत्रकार परिषदेत सांगितला. या नाटकातून अंधश्रद्धा पसरण्याची शंका व्यक्त करणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील एका सदस्याचा मान ठेवण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा नाटक विचारार्थ ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही ते म्हणाले.[]

पुनर्निर्णयासाठी समिती

[संपादन]

‘या नाटकाच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या आदेशावरून एक समिती नेमण्यात आली असून ही समिती पुन्हा एकदा विचार करून निष्कर्ष काढेल. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा होईल आणि मग सचिवांच्या उपस्थितीत सेन्सॉर बोर्डाची बैठक घेण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच नाटकाला परवानगी देण्यात येईल,‘ असे राम जाधव यांनी स्पष्ट केले. समिती निर्णयासाठी किती कालावधी घेईल हे सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.[]

दिग्दर्शकांची विनंती अव्हेरली

[संपादन]

दरम्यान, दिग्दर्शक हरीष इथापे यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत प्रयोग करू द्या, लोकांचे आक्षेप आले तर त्यानंतर नाटक कायमस्वरुपी बंद करून टाकू, अशी विनंती केली. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा संदेश देणारे हे नाटक अंधश्रद्धेलाच चालना कसे देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या विनंतीला स्पष्टपणे नकार देण्यात आला.[]

राम जाधव यांना ठणकावले

[संपादन]

रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राम जाधव यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले गिरीश गांधी यांनी ‘दाभोळकरचे भूत’ या नाटकाच्या मुद्यावरून सेन्सॉर बोर्डाला चांगलेच धारेवर घेतले आणि मुठभर लोकांमुळे अभिव्यक्तीवर घाला पडत असेल तर त्या सदस्यांना घरचा रस्ता दाखवा, या शब्दांत ठणकावले. इतके असूनही राम जाधव यांनी नाटकाला परवानगी देण्यास नकार दिला.[]

नव्या समितीचा निर्णय

[संपादन]

नव्या त्रि-सदस्य समितीने ‘दाभोळकरचे भूत’ नाटकाला हिरवा कंदील दाखवला, पण तरीही राम जाधव यांनी नाटकाला परवानगी नाकारली.[]

राम जाधव यांचे घुमजाव

[संपादन]

शेवटी वर्तमानपत्रांमधून खूप गाजावाजा झाल्यावर ’केवळ बहुमता’चा आदर ठेवण्यासाठी नाटकाला २९ जुलै २०१४ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या जाधव यांनी प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली. दोन्ही समित्यांचा अहवाल सांस्कृतिक मंत्र्यांना सादर केल्यानंतर नाटकावर निर्णय घेण्यात येईल, असे म्हणणाऱ्या राम जाधवांना आता तशी गरज वाटली नाही.

परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळताच

[संपादन]

परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळताच या नाटकाचे २० ऑगस्ट २०१४पासून सलग पाच प्रयोग झाले. या तारखेला नरेंद्र दाभोलकरांची पहिली पुण्यतिथी होती.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "'दाभोळकरचे भूत'ला अखेर परवानगी". Maharashtra Times. 2018-12-13 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ a b c archana. "'सेन्सॉर'कल्लोळ! |" (इंग्रजी भाषेत). 2018-12-13 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "'दाभोळकरचे भूत'ने झपाटले". Maharashtra Times. 2018-12-13 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ author/admin. "मी नरेंद्र दाभोळकर बोलतोय..." Lokmat. 2018-12-13 रोजी पाहिले.