Jump to content

थेरेमिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक इथरवेव्ह-थेरेमिन : डावा ॲंटेना आवाजाची पातळी नियंत्रित करतो, तर उजवा ॲंटेना स्वर नियंत्रित करतो.

थेरेमिन एक इलेक्ट्रॉनिक वाद्य यंत्र आहे ज्याला बिना स्पर्श करता वाजवता येऊ शकते. रशियन आविष्कारक लेओन थेरेमिन (Термéн) यांनी या यंत्राची निर्मिती केली आणि १९२८ मध्ये या यंत्राचे पेटंट घेतले.[] त्यांच्या पाश्चिमात्य नावावरून या यंत्राला थेरेमिन हे नाव देण्यात आले.

या यंत्राच्या विद्युत मंडलामध्ये निर्वात नलिका, संवाहक तारेचे वेटोळे व विद्युत धारित्र (विद्युत भार साठवून ठेवणारा घटक) या घटकांपासून विद्युत् कंपने निर्माण होतात. याच्या नियंत्रण प्रणालीमध्ये दोन धातूचे ॲंटेना असतात जे थेरेमिन वादकाच्या हातांच्या तुलनात्मक स्थितीचा आणि हालचालींचा अंदाज घेतात. वादकाने आपला हात विद्युत् मंडलातील एका ॲंटेनापासून दूर वा जवळ नेल्यास विद्युत् धारित्राचे मूल्य व त्या प्रमाणात वारंवारता बदलते आणि दुसऱ्या ॲंटेनाच्या जवळील हाताच्या हालचालीतून आवाजाची पातळी नियंत्रित होते. वाद्यवृंदात सूत्रसंचालक हातवाऱ्यांच्या संकेतांनी वेगवेगळ्या वादकांकडून जशी संगीताकृती घडवून घेतो जणू तसेच थेरेमिन वाद्यवादक हात हालवून स्वर निर्माण करतो. ह्या वाद्यातील विद्युत् कंपने उच्च व म्हणून श्रवणातीत असतात. श्राव्य-ध्वनिनिर्मितीसाठी एक स्थिर व दुसरे बदलणारी कंप्रता असलेले अशी दोन विद्युत मंडले योजून त्यांच्यापासून निर्माण होणारी कंपने एकत्र मिसळून दोन कंप्रतांच्या वजाबाकी एवढी कंप्रता निर्माण करतात. ही कंप्रता श्रवण मर्यादेत येते. ही विद्युत कंपने ध्वनिक्षेपकाच्या योगे स्वररूपात प्रकट होतात.[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ US1661058
  2. ^ पुणतांबेकर, व. अ. "इलेक्ट्रॉनीय वाद्ये". मराठी विश्वकोश. खंड २. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. ५०५६.