Jump to content

त्रिपंखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्रिपंखी (संस्कृत: त्रिपक्षी; हिंदी: त्रिपुंखी; इंग्लिश:ट्रेलिंग कोल्डेनिया; लॅटिन: कोल्डेनिया प्रोकम्बेन्स; कुल–बोरॅजिनेसी) ही ओलसर जमिनीवर पसरून वाढणारी ही अनेक फांद्यांची व एक वर्षभर जगणारी वनस्पती आहे. ही औषधी वनस्पती भारतात सर्वत्र, श्रीलंका व इतर अनेक उष्ण देशांत तणासारखी आढळते. कोवळे खोड व फांद्या लवदार असून पांढरट दिसतात. हिची पाने लहान (१·३–३·८ X ०·६ सेंमी.), एकाआड एक, तळाशी निमुळती असून पानांची किनार (कडा) काहीशी विभागलेली, बोथट दात्यांची व टोकास गोलसर असते; त्यांच्या दोन्ही बाजूंस दाट पांढरट लव असते. हिला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये लहान, पांढरी किंवा फिकट पिवळी फार लहान देठांची फुले पानांच्या बगलेत एकेकटी येतात. संदले जुळलेली; प्रदले व केसरदले प्रत्येकी चार असून किंजपुट किंचित चतुष्खंडी (चार भागी) व त्यात चार बीजके असतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) पण शुष्क फळ फार लहान (३ X ४ मिमी.) असून त्यावर दोन फुगीर रेषा व दोन खोलगट रेषा असतात; ते तडकल्यावर चार शकले होतात; बिया चार असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे भोकर (बोरॅजिनेसी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ताजी पाने वाटून संधिवातातील सुजेवर लावतात. फोड व गळवे पिकण्यासाठी मेथीचे चूर्ण गरम करून या सुक्या वनस्पतीसह समभाग लावतात. या वनस्पतीचा अंतर्भाव एहरेशिएसी या कुलात काही वनस्पतीवैज्ञानिक (सांतापाव) करतात; तिच्या वंशातील २०–२४ जातींपैकी भारतात ही एकच आढळते.