तेरा अमाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेन्री द लुम्ले याने तेरा अमाता येथील एका झोपडीचे केलेले प्रतिचित्रण

तेरा अमाता हे फ्रान्समधील नीस बंदराजवळ असलेले पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ आहे. इ.स. १९५९ साली नीस बंदराच्या बांधणीवेळी येथे काही अश्मयुगीन हत्यारे मिळाली. इ.स. १९६५ सालीही एका इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बुलडोझरच्या साहाय्याने जमीन सपाट करतेवेळीही पुन्हा मोठ्या प्रमाणावर हत्यारे सापडली. त्यानंतर इ.स. १९६६ साली हेन्‍री द लुम्ले याने तेथे शास्त्रीयदृष्ट्या उत्खनन केले.

उत्खनन[संपादन]

लुम्ले याने केलेल्या उत्खननात त्याला एकूण एकवीस लंबगोल आकाराच्या झोपड्यांचे अवशेष मिळाले. त्यांची लांबी २६ ते ४९ फूट आणि रुंदी १३ ते २० फूट असल्याचे आढळून आले. प्रत्येक झोपडी गोल लाकडी दांडके रोवून तयार करण्यात आलेली होती. या दांडक्यांची जाडी सुमारे तीन इंच असून त्यांच्या बुडाशी जमिनीवर मोठमोठे दगड त्यांना आधार म्हणून ठेवलेले होते. प्रत्येक झोपडीत मधोमध चुलीची योजना केलेली होती. जमिनीत खड्डा खोदून व त्याभोवती दगड ठेवून अशा चुली केलेल्या होत्या. यातील एका झोपडीत माणसाच्या पायाचा ठसा दिसून आला. तो माणसाच्या उजव्या पायाचा होता व त्याची लांबी साडेनऊ इंच होती.

या झोपड्यांजवळच मानवी विष्ठेचे अवशेष सापडले. त्याचे पृथ:करण द ब्यूल्यू याने केले, त्यावरून तिथे राहणारे मानव वसंत ॠतूच्या अखेरीस अथवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस उगवणाऱ्या वनस्पती खात होता, असा निष्कर्ष निघाला. केवळ अशाच वनस्पतींचे अवशेष विष्ठेत मिळाल्याने या झोपड्यांत याच मोसमात मानव वस्तीस येत असावेत हे सिद्ध झाले.

कासव, ससे, काळवीट, रानडुक्कर, हरीण, बैल इत्यादींची हाडे झोपड्यांत सापडली. ही हाडे प्रौढ जनावरांची नसून लहान वयाच्या जनावरांची असल्याने त्यांचे मांस तत्कालीन मानव खात होता हे सिद्ध झाले. तेथे सापडलेल्या पुराव्यांवरून मानव झोपड्यांतच आपली हत्यारे बनवीत होता, असे दिसते. जनावरांच्या कातड्यावर बसून तो हत्यारे बनवीत असे. अशा कातड्यांची प्रतिकृती जमिनीवर उमटलेली असून त्याभोवती असंख्य दगडी छिलके पसरलेले आढळून आले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्यदुवे[संपादन]

गुणक: 43°41′52″N 7°17′22″E / 43.69778°N 7.28944°E / 43.69778; 7.28944