Jump to content

ताम्रपाषाण युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नवाश्मयुगाची सुरुवात व शेवट यांची प्रक्रिया जगाच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या काळी झाली, त्याप्रमाणे ताम्रपाषाणयुगाची सुरुवातही सर्वत्र समकालीन आढळत नाही.

अ‍ॅनातोलियात ब्रॉंझ अथवा ताम्रपाषाणयुगाची प्राचीनता इ.स.पू. सातवे सहस्रक इतकी मागे नेता येते, तर ग्रीस, क्रीट, मेसोपोटेमिया, ईजिप्त या प्रदेशात इ.स.पू. तिसरे सहस्रक, पू. यूरोपात इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाचा मध्यकाळ, इंग्लंडमध्ये इ. स.पू. सुमारे १९००, ात इ.स.पू. २५००, तर चीनमध्ये इ.स.पू. सुमारे १८०० या काळांत ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रचलित होत्या; असे आढळून आले आहे.

काही पुरातत्त्वज्ञ ताम्रयुग आणि ब्रॉंझयुग अशी वेगवेगळी युगे कल्पितात; परंतु ही कल्पना सर्वमान्य झालेली नाही. तांब्यात काही प्रमाणात नैसर्गिक रीत्याच कथिल असते. ब्रॉंझ म्हणजे तांबे व कथिल यांचे मिश्रण, तेव्हा ताम्रयुग व ब्रॉंझ युग असे वेगवेगळे सांस्कृतिक कालखंड कल्पिता येत नाहीत. या उलट मानव मुद्दाम तांब्यात कथिलाचे मिश्रण करू लागला, तेव्हा कथिलाचे प्रमाण अशा मिश्रणात नैसर्गिक तांब्यात असणाऱ्या कथिलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून येत असल्याने ताम्रयुग व ब्रॉंझयुग हे वेगवेगळे कालखंड मानावेत; असे काही तज्ञ म्हणतात. या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामुळे तांब्याला टणकपणा येऊन नैसर्गिक तांब्यापेक्षा साच्यात ओतल्यावर जास्त सफाई येते. नैसर्गिक तांबे टणक नसते. असे असले, तरी कच्चे तांबे ठोकून त्यापासून लहानसहान वस्तू बनविण्याची कला अ‍ॅनातोलिया व इराणमध्ये जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती. तांबे शुद्ध करणे व साच्यात घालून वस्तू बनविणे या प्रक्रिया सुमेर आणि ईजिप्तमध्ये इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी रूढ झाल्याचे दिसते.

नैसर्गिक तांबे प्राचीन काळी अनेक ठिकाणी उपलब्ध होते. ईजिप्त, आशिया, मायनर, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन, डॅन्यूबचे खोरे आणि राजस्थान (भारत) या विविध प्रदेशांत ते आढळून आल्याने ताम्रपाषाण संस्कृतीच्या त्या त्या भागांतील लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला; परंतु हे साठे संपताच त्यांना खनिजमिश्र तांब्याचे साठे शोधावे लागले. खनिज तांबे उष्णतेच्या साहाय्याने शुद्ध करून घेण्याचे तंत्र यामुळे आत्मसात करावे लागले. या तंत्राचा वापर इ.स.पू. ३००० च्या आसपास पश्चिम आशियातील लोक करीत होते.

नवाश्मयुगाचा शेवट व ताम्र/ब्रॉंझ–पाषाणयुगाची सुरुवात हे सांस्कृतिक व तांत्रिक उत्क्रमण हळूहळू होत गेले. ईजिप्तमधील बॅदारियन आणि अम्रेशियन संस्कृतीचे लोक पाषाणाच्या हत्यारांबरोबरच तांब्याच्या लहान नळ्या व मासे पकडायचे गळ वापरीत. या वस्तू नैसर्गिक तांब्यापासून बनविल्या जात. खनिज तांबे शुद्ध करण्याचे ज्ञान या लोकांना नव्हते. याउलट मेसोपोटेमियात टेल हलाफ व ओबेद येथील ताम्रपाषाण संस्कृतीचे लोक शुद्ध तांब्याचे मणी व मासेमारीचे गळ वापरीत. स्यूसा (इराण) येथील रहिवासी कुऱ्हाडी, छिन्न्या, आरसे व सुया यांसारख्या प्रगत तंत्राच्या वस्तू बनवीत. ईजिप्तचे फेअरो राजे सिनाई वाळवंटातून तांबे आणवीत, अ‍ॅसिरियन लोक ते अ‍ॅनातोलियातून आणवीत. यूरोपात इ.स.पू. १६०० पासून खनिज तांब्याच्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या.

ताम्रपाषाणयुगात व्यापारउदीम वाढला, त्याचप्रमाणे धातूकामात प्रावीण्य मिळविलेल्यांचा वर्ग निर्माण झाला. तांबट अन्नोत्पादनाच्या कामात सहभागी न होता, आपल्या धातुविद्येतच प्रावीण्य मिळवू लागले. तांबे शुद्ध करून साच्यात ओतणे ही क्रिया सोपी नसल्याने ही एक तंत्रशाखाच निर्माण झाली व कालांतराने अशा तज्ञ तांबटांचे संघ अथवा श्रेणी निर्माण झाल्या. तत्कालीन समाजाला अशा तंत्रज्ञांकरता धान्योत्पादन करावे लागे. एवढेच नव्हे, तर ज्या प्रदेशातून कच्चे तांबे आणून या तांबटांना विविध वस्तू बनविण्यासाठी द्यावयाचे, त्या प्रदेशांतील लोकांनाही तांब्याच्या बदली धान्य द्यावे लागे. त्यामुळे धान्योत्पादन वाढवावे लागले. या गरजेपोटी ताम्रपाषाणयुगात नांगराचा व चाकाचा शोध लागला. नांगरामुळे विस्तृत जमीन लागवडीखाली आणता आली व चाकामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे ताम्रपाषाणयुगात नगरांचा उदय झाला, मानवी जीवन स्थिर व जास्त सुखी झाले आणि विविध कलांचा उगम झाला. क्रीटमधील मिनोअन संस्कृती, ग्रीसमधील मायसीनियन संस्कृती व इजीअन बेटांतील सायक्लॅडिक संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या नागरीकरणाची साक्ष देतात. भारतातील सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगातच अंतर्भूत केली जाते. कारण तांब्याच्या विविध वस्तूंबरोबरच चर्ट दगडाची धारदार पातीही हे लोक वापरत होते.

भारतीय उपखंडात सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. प्रदेशांत ताम्रपाषाणयुगीन सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. मोहें–जो–दडो व हडप्पा यांव्यतिरिक्त सिंधमध्ये कोटदिजी, राजस्थानात कालिबंगा, गुजरातमध्ये लोथल व पंजाबमध्ये रूपड ही या संस्कृतींची महत्त्वपूर्ण स्थळे ठरली आहेत.

सिंधू संस्कृतिव्यतिरिक्त भारतात मध्य प्रदेश, गुजरात–महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब व काश्मीर एवढ्या विस्तृत प्रदेशांत ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांनी वसती केल्याचा पुरावा गेल्या पंचवीस वर्षांत उपलब्ध झाला. मात्र सिंधू संस्कृति सोडता, या इतर प्रादेशिक संस्कृती नागरी स्वरूपाच्या नाहीत. पांढऱ्या रंगात चित्रकाम असलेली काळी आणि तांबडी मृत्पात्रे, दगडगोट्यांची व मातीची घरे आणि तांब्याचे शुद्धीकरण करून त्यापासून वस्तू बनविण्याची कला ही वैशिष्ट्ये असलेली राजस्थानातील बनास अथवा आहाड संस्कृती; गोल आणि काटकोन चौकोनी घरे, तांब्याच्या कुऱ्हाडी व तलवारी, गारगोटींच्या छिलक्यांचे हत्यारे, गहू, वाल, उडीद इ. धान्यांची लागवड आणि अत्यंत मनोहर चित्रण असलेली निरनिराळ्या आकारांची मृत्पात्रे ही वैशिष्ट्ये असलेली मध्य प्रदेशातील माळवा संस्कृती; टणक भाजणी, लाल पृष्टभागांवर काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची मडकी, वाडगे व कळशा असे आकार असलेली मृत्पात्रे, मृत मुलाचे दोन मडक्यात व प्रौढांचे रांजणात दफन, गारगोटींच्या छिलक्यांची व तांब्याची हत्यारे, गहू व बार्ली यांची लागवड व त्यासाठी पाटबंधाऱ्याची योजना ही वैशिष्ट्ये असलेली महाराष्ट्राची जोर्वे संस्कृती; या सर्व ताम्रपाषाणयुगीन आहेत, या संस्कृतीचा नाश इ.स. पू. १००० च्या सुमारास झाला. याच सुमारास भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला.