तरुण तुर्क म्हातारे अर्क
तरुण तुर्क म्हातारे अर्क हे एक मराठी नाटक आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मधुकर तोरडमल यांचे आहे. हे नाटक मधुकर तोरडमल यांनी रंगविलेल्या इरसाल प्रा. बारटक्के या भूमिकेमुळे गाजले. त्यांच्या स्वतःच्याच ‘रसिकरंजन’ नाटय़सस्थेतर्फे त्यांनी हे नाटक रंगभूमीवर सादर केले होते.
अहमदनगर येथील ‘अहमदनगर महाविद्यालया’त तोरडमल यांनी दहा वर्षे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली. या काळात विद्यार्थ्यांशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. विद्यार्थ्यांचे बोलणे, त्यांची प्रेमप्रकरणे, त्यांच्यातील चेष्टामस्करी, महाविद्यालयीन वातावरण हे सगळे त्यांना अनुभवायला मिळाले. त्या महाविद्यालयीन नोकरीत प्रत्यक्ष पाहायला मिळालेली पात्रे तोरडमलांनी या नाटकाद्वारे रंगवली. नाटकातील ‘प्रा. बारटक्के’ या पात्राच्या तोंडी ‘ह’ची बाराखडी आहे. अशा भाषेत बोलणारी व्यक्ती लेखकाने प्रत्यक्ष पाहिली होती. त्यामुळे नाटकात ती आली.
एका समीक्षकाने ठळकपणे म्हणले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषतः पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरशः रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’बालगंधर्व’ नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे ३ प्रयोग झाले. ‘बालगंधर्व’च्या त्या प्रयोगांना येणाऱ्या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख श्री. बाळ ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.
‘रसिकरंजन’तर्फे त्यांनी या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले. त्यानंतर अन्य नाट्यसंस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. २०१४ साली या नाटकाचा संयुक्त पाच हजारांवा प्रयोग तोरडमल यांच्या उपस्थितीत साजरा झाला.