डरायस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डरायस : (इ. स. पू. ५५८–इ. स. पू. ४८६). प्राचीन इराणमधील ॲकीमेनिडी वंशातील एक श्रेष्ठ राजा. तो डरायस द ग्रेट किंवा डरायस हिस्टॅस्पिस या नावाने ओळखला जातो. हिस्टॅस्पिस या पार्थियातील क्षत्रपाचा तो मुलगा. त्याच्या संबंधीची माहिती बेहिस्तून येथील कोरीव लेख, हिरॉडोटस व टीझिअस यांचे वृत्तांत आणि काही पारंपरिक कथा यांतून मिळते.

सत्ता[संपादन]

हिरॉडोटसच्या मते डरायसने तरुणपणी सायरसविरुद्ध कट रचला होता पण प्रत्यक्षात सत्ता मात्र त्याच्या हाती दुसरा कॅम्बायसीझच्या मृत्य नंतर इ. स. पू. ५५२ मध्येच आली आणि त्याकरिता त्याला काही इराणी लोकांची मदत घ्यावी लागली. त्याची पहिली ६–७ वर्षे कॅम्बायसीझच्या राज्यावर अंमल बसविण्यात गेली. या वेळी सभोवतालच्या लहानमोठ्या प्रदेशांतून बंडे उद्‌भवली आणि स्यूसियाना, मीडिया, सागर्टिया, मार्जीयाना (म्येर्फ), बॅबिलोनिया वगैरे ठिकाणी स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. डरायसने ती एकापाठोपाठ एक शमविली आणि आपली सत्ता सर्वत्र स्थापन केली. राज्यांतर्गत सुव्यवस्था आणि शांतता निर्माण झाल्यानंतर त्याने इ. स. पू. ५१८ मध्ये इजिप्तला भेट दिली. इजिप्तचा क्षत्रप आर्यांडिस स्वतःस स्वतंत्र राजा समजत असे. त्याला ठार करून डरायसने दुसऱ्या क्षत्रपाची तेथे नियुक्ती केली. पुढे त्याने अनेक स्वाऱ्या आयोजीत केल्या. प्रथम त्याने वायव्येकडे मोहरा फिरवून केवळ आयोनियाच नव्हे, तर युरोपच्या भूमीवरील सिथियावर स्वारी केली. या स्वारीचा उद्देश गनिमी काव्याने लढणाऱ्या सिथियन टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करणे, हा होता. तत्पूर्वी इ. स. पू. ४९९ मध्ये त्याने ग्रीसच्या किनाऱ्यावर आपल्या युद्धनौका धाडल्या आणि इ. स. पू. ४९३ मध्ये ग्रीसवर आक्रमण करण्याकरिता बॉस्पोरसची सामुद्रधुनी ओलांडली. तिथे त्याचा थ्रेसियन लोकांनी पराभव केला पण पुन्हा त्याने इ. स. पू. ४९० मध्ये स्वारी केली. त्या वेळी अथेनियन लोकांनी त्याचा पराभव मॅरॉथॉन या ठिकाणी केला. याशिवाय त्याने इराणच्या आसपासचा सायरसच्या अंमलाखाली असणारा बहुतेक प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला होता. मृत्युसमयी त्याचे इराणी साम्राज्य जवळजवळ १६ लाख चौ. किमी. एवढे मोठे होते. काबूल व सिंधू यांच्या पलीकडेही त्याने मोहिमा आखल्या होत्या.

प्रशासन[संपादन]

एवढ्या मोठ्या राज्याची प्रशासनव्यवस्था त्याने चोख ठेवली होती. त्याकरिता राज्याचे वीस प्रांत पाडून प्रत्येक प्रांतावर एक सर्वाधिकारी राज्यपाल (क्षत्रप) नेमला होता. ही पद्धत त्याने सायरसकडूनच घेतली होती. या सर्व विस्तृत प्रदेशात सडका व इतर दळणवळणाची व्यवस्था केली. नाईल ते सुएझ असा एक कालवा खोदविला आणि सिसिली व इटली यांच्या किनाऱ्याची पाहणी केली होती. तसेच नियमित वसुलाचीही व्यवस्थाही त्याने केली होती. राज्यपालांवर नियंत्रण असावे, म्हणून आणखी काही अधिकारी त्याने नेमले होते. प्रशासनाबरोबरच त्याने इराणी वास्तुशैलीत मोलाची भर घातली.स्यूसा, पर्सेपलिस, एकबॅटना, बॅबिलन वगैरे मोठ्या शहरांतून इमारती बांधल्या आणि एक विशिष्ट वास्तुशैली प्रचारात आणली. इ. स. पू. ५२१ मध्ये स्यूसा ही त्याने आपली शासकीय राजधानी केली आणि त्या शहराची तटबंदी करून तिथे एक भव्य श्रोतृगृह (अपादान) व एक राजवाडा बांधला. त्या राजवाड्यातील एका कोरीव लेखात त्याने वास्तुविशारद व साहित्य कसे जमविले, यासंबंधी लिहून ठेवले आहे. याशिवाय मूळ राजधानी असलेल्या पर्सेपलिस येथेही त्याने काही इमारती बांधल्या.

तो धार्मिक बाबतीत सहिष्णू होता. आपण जरथुश्त्राचा अनुयायी असल्याचा त्याने बेहिस्तून येथील कोरीव लेखात उल्लेख केला आहे. या लेखांतील लिपीमुळे क्युनिफॉर्म लिपीचा शोध लागणे सुलभ झाले. जेरूसलेम येथील ज्यू लोकांना मंदिर बांधण्यास त्याने परवानगी दिली होती. इजिप्तमधील अनेक धार्मिक अवशेषांतून त्याचे नाव आढळते.

डरायसने जवळजवळ ३६ वर्षे राज्य केले. अखेरपर्यंत तो मोहिमांचा विचार करीत होता, असे त्याच्या नियोजनावरून दिसते. त्याने अटॉसा या सायरस द ग्रेटच्या मुलीशी लग्न केले. तिच्यापासून झालेला पहिला झर्कसीझ पुढे इराणच्या गादीवर आला.

दुसरा डरायस[संपादन]

दुसरा डरायस (इ. स. पू. ४२३–इ. स. पू. ४०४). यांचे मूळ नाव ओकस. हा आर्टक्झर्क्सीझचा एका बॅबिलोनियन पत्नीपासून झालेला मुलगा. त्याने आपल्या सावत्रभावाकडून राज्य मिळविले. राज्यकारभारात त्याची सावत्र बहिण व पत्नी परिसटिस हिचे सर्वत्र प्राबल्य होते. यावेळी आशिया मायनर आणि इजिप्तमध्ये बंडे झाली, तेव्हा परिसटिस या राणीने आपला धाकटा मुलगा तरुण सायरस याला आशिया मायनरमध्ये क्षत्रप नेमले. दुसरा डरायस बॅबिलन येथे मरण पावला आणि दुसरा आर्टक्झर्क्सीझ गादीवर आला.

तिसरा डरायस[संपादन]

तिसरा डरायस (इ. स. पू. ३३६–इ. स. पू. ३३०). कडोमॅनस हे याचे मुल नाव. दुसऱ्या डरायसचा हा खापरपणतू. बगोअस नावाच्या हिजड्याच्या मदतीने तिसऱ्या आर्टक्झर्क्सीझचा खून करून तो इराणच्या गादीवर आला. इ. स. पू. ३३४ च्या ग्रॅनिकसच्या लढाईत अलेक्झांडरने त्याचा पराभव केला. तरीही पुन्हा सैन्य जमवून तो अलेक्झांडरशी लढण्यासाठी आला. इससच्या लढाईत अलेक्झांडरने पुन्हा त्याचा पराभव केला व त्याची सर्व कुटुंबीय माणसे पकडली. तेव्हा त्याने अलेक्झांडरशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण अखेर गॉगामीला येथे याचा पराभव झाला. तेव्हा तो एकबॅटनला पळाला. बेसस नावाच्या त्याच्याच एका क्षत्रपाने त्याचा खून केला. त्याचा मृत्यूनंतर ॲकिमेनिडी वंश संपुष्टात आला.