टॅननबर्गची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॅननबर्गची लढाई : टॅननबर्ग (हल्लीचे नाव स्टिंबार्क) पोलंडमधील वॉर्साच्या उत्तरेस सु. ६३ किमी. अंतरावर आहे. १९१४ साली ते जर्मनीच्या पूर्व प्रशिया प्रांतात होते. टॅननबर्गच्या पूर्वेस ६० किमी.वर मझुरीअन सरोवरांची रांग सुरू होऊन ती उत्तरेस गुंबिनन (हल्लीचे नाव गूस्यिफ, रशिया) गावाच्या दक्षिणेस सु. ५० किमी.वर संपते. टॅननबर्गच्या पूर्वेस असलेला प्रदेशही जंगलमय होता. येथील पहिली लढाई (१५ जुलै १४१०) प्रशियाच्या ट्यूटन सरदारांची सेना व पोलंडचा राजा जागिएलो यांच्यात होऊन त्यात ट्यूटन सरदार पराभूत झाले. त्यामुळे ट्यूटनांचे पोलंडवरील वर्चस्व कायमचे नष्ट झाले. या लढाईत रशिया, लिथ्युएनिया आणि बोहीमियाचा झिश्का यांची सैन्ये पोलंडच्या बाजूने लढली. दुसरी लढाई २६ ते ३१ ऑगस्ट १९१४ मध्ये पूर्व प्रशिया काबीज करण्याच्या हेतूने रशियाने सुरू केली. रशियाच्या बाजूने पूर्व प्रशियावर दोन प्रकारे चढाई करणे शक्य होते. एक म्हणजे मझुरीअनच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून एकाच वेळी हल्ला करणे परंतु यात मझुरीअनच्या अडथळ्यामुळे सैन्य दुभंगले जाऊन त्याचे नियंत्रण करणे कठीण होते. दुसरा प्रकार असा, की मझुरीअनच्या दक्षिणेकडून टॅननबर्गच्या दिशेने उत्तरेला बाल्टिक समुद्राकडे शिरून प्रशियन सैन्याची कोंडी करणे. रशियाने पहिला प्रकार अवलंबिला व २० ऑगस्ट रोजी गुंबिनन येथे जर्मनांना हार खावी लागली टॅननबर्गच्या दिशेने रशियाची दुसरी सेना सेनापती समसॉनॉव्ह याच्या मार्गदर्शनाखाली आगेकूच करीत होती. कोंडमारा होणार या भीतीने जर्मन सेनापती प्रिटवित्सने आपल्या सेनेला व्हिश्चला नदीपर्यंत माघार घेण्याचा हुकूम दिला. जर्मन सेनाप्रमुखाने प्रिटवित्सला काढून ⇨ हिंडेनबुर्खला सेनापती व लूडेन्डोर्फला स्टाफप्रमुख म्हणून नियुक्त केले. प्रिटवित्सच्या हाताखालील कारवाईप्रमुख कर्नल होफमान याला रशियाच्या आगामी हालचालींचे बेत कळल्यामुळे त्याने माघारीची आज्ञा रद्द केली व उत्तरेस एका घोडदळाची बचावफळी उभी करून बाकीचे सैन्य दक्षिणेकडे समसॉनॉव्हच्या समोर उभे केले. हिंडेनबुर्ख आणि लूडेन्डोर्फ यांनी हा व्यूह पसंत केला. रशियन सेनापतींना या हालचाली मुळीच समजल्या नाहीत, त्यामुळे रशियाची उत्तरेकडील सेना स्वस्थ बसली. जर्मनांनी प्रतिहल्ला करून समसॉनॉव्हच्या सेनेची टॅननबर्गच्या पूर्वेकडील जंगलात कोंडी करण्याचे ठरविले. लूडेन्डोर्फचा बेत मात्र वेगळाच होता. परंतु जर्मन सेनापती फ्रान्सोआने लूडेन्डोर्फच्या आज्ञेचा भंग करून रशियन सेनेचे परतीचे सर्व मार्ग बंद केले. परिणामतः कोंडीत सापडलेल्या रशियन सैन्याला पराभव पतकरावा लागून महायुद्धाच्या शेवटापर्यंत बचावात्मक युद्ध खेळावे लागले. टॅननबर्गच्या लढाईत १,२०,००० रशियन सैनिक कैदी बनले. जर्मनांनी या युद्धात आंतरफळी रणतंत्र (बॅटल ऑफ इंटीरियर लाइन्स) वापरले. या लढाईचे खरे मानकरी होफमान व फ्रान्सोआ हेच होत परंतु होफमान व फ्रान्सोआच्या औदार्यामुळे इतिहासात हिंडेनबुर्ख व लूडेन्डोर्फची नावे पुढे आली.