Jump to content

भेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टक्काचोर या पानावरून पुनर्निर्देशित)

चित्रदालन

[संपादन]

मराठी नाव : भेरा, टक्काचोर
हिंदी नाव : टका चोर
संस्कृत नाव : करायिका, भष
इंग्रजी नाव : Rufous Tree Pie
शास्त्रीय नाव : Dendrocitta vagabunda


साधारण २३ सें. मी. (९ इं) आकाराचा भेरा पक्षी लांब शेपटीसह सुमारे ५० सें. मी. आकाराचा भरतो. याचे डोके, कंठ, छाती काळसर राखाडी रंगाचे, चोच काळी, पंखावर काळा व पांढरा पट्टा, पोटाचा, पाठीचा मुख्य रंग तपकिरी आणि शेपटीच्या टोकाशी काळा भाग असतो. भेरा नर-मादी दिसायला सारखेच असतात.

भेरा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशातही आढळतो. रंग आणि आकारमानावरून याच्या किमान ५ उपजाती आहेत.

भेरा झुडपी जंगल, शेतीचे प्रदेश, पानगळीचे जंगल या ठिकाणी राहणे पसंत करतो. हा पक्षी कावळ्यासारखाच सर्वभक्षक असून फळे, कीटक, पाली, बेडुक, शतपाद, इतर पक्ष्यांची अंडी, लहान पिले, उंदीर असे सर्व प्रकारचे खाद्य त्याच्या आहारात असतात.

फेब्रुवारी ते जुलै हा काळ भेरा पक्ष्याचा विणीचा काळ असून तो गवत, काड्या, काटे यापासून खोलगट घरटे तयार करतो. भेराचे घरटे जमिनीपासून उंच असलेल्या झाडांमध्ये व्यवस्थित लपलेले असते. मादी एकावेळी ४ ते ५ अंडी देते. साधारणपणे ही अंडी पांढऱ्या रंगावर लाल-तपकिरी तुटक रेषा किंवा ठिपके असलेली असतात, पण यात आणखीही विविध प्रकार आढळले आहेत. भेरा नर आणि मादी पिलांना खाऊ घालण्याचे मिळून करतात.

जंगलात शिकार झाल्यावर शिकाऱ्याला चुकवून भेरा आपला हिस्सा पळवून नेतो. यावरून याला टका (हिस्सा) चोर नाव पडले असावे.