Jump to content

झॉर्झ क्लेमांसो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झॉर्झ क्लेमांसो (२८ सप्टेंबर १८४१–२४ नोव्हेंबर १९२९). फ्रान्सचा पहिल्या महायुद्धकाळातील पंतप्रधान, एक फ्रेंच मुत्सद्दी आणि प्रसिद्ध वृत्तपत्रकार. म्वेलेराँ-एन परेड्स (हँदे) या गावी तो जन्मला. वैद्यकीय शिक्षण घेऊन त्याने काही दिवस तो व्यवसाय केला.१८६५ मध्ये तो अमेरिकेस गेला आणि तेथे त्याने वार्ताहाराचे काम केले. या वेळी त्याने मेरी प्लमर या तरुणीशी विवाह केला व तो १८६९ मध्ये फ्रान्सला परतला. १८७१ मध्ये तो राष्ट्रीय संसदेवर निवडून आला. ड्रायफस प्रकरणात त्याने ड्रायफसची बाजू घेतली. पुढे १८७६ ते १८९३ पर्यंत तो फ्रान्सच्या कायदेमंडळाचा सभासद होता.

वार्ताहार ते राज्यकर्ता

[संपादन]

ला ज्युस्तिस या दैनिकातून तो नियमित लिही. पुढे १९०३ मध्ये तो सीनेटवर निवडून आला. १९०३ मध्ये फ्रेंच मंत्रिमंडळात गृहमंत्री झाला व लवकरच सरेनंतर पंतप्रधान झाला. ह्या काळात त्याने मोरोक्कोचा प्रश्न सोडविला आणि इंग्लंडबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापिले. १९०९ मध्ये त्याची प्रधानकी संपली. तो सरकारवर सडेतोड टीका करी. १९१३ मध्ये फ्रान्सचे लष्कर आणि जर्मनीचा धोका यांसंबंधीचे विचार मांडण्यासाठी त्याने ल होम लिब्रे हे दैनिक काढले. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध चालू झाल्यावर त्यावर सेन्सॉरचे आघात वारंवार होऊन ते बंद करण्यात आले. तेव्हा त्याने ल होम एनचेन हे नवीन दैनिक काढले. त्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या या प्रचारामुळे १९१७ मध्ये तो पुन्हा पंतप्रधान झाला. फ्रान्सचे धैर्य व लष्करी सामर्थ्य यांस बळकटी आणून त्याची त्याने वाढ करण्याकडे लक्ष केंद्रित केले आणि दोस्त राष्ट्रांच्या खांद्यास खांदा लावून लढत दिली. पहिल्या महायुद्धानंतर पॅरिस येथे झालेल्या शांतता परिषदेचा तो अध्यक्ष होता आणि तेथेच व्हर्सायचा इतिहासप्रसिद्ध तह कायम झाला. १९२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत तो पराभूत झाला तथापि अमेरिकेने यूरोपीय राजकारणातून अंग काढून घेऊ नये, म्हणून त्याने वैयक्तिक जबाबदारीवर अमेरिकेत शहरोशहरी व्याख्याने देऊन यशस्वी प्रचार केला. उर्वरित आयुष्य त्याने आपल्या गावी लेखन-वाचनांत घालविले.

क्लेमांसो एक प्रखर टीकाकार आणि उत्कृष्ट वक्ता होता. त्या वेळी टायगर ह्या नावाने तो प्रसिद्ध होता. त्याची ग्रँजर अँड मीझरी ऑफ व्हिक्टरी (इं. शी. १९३०), इन द ईव्हिनिंग ऑफ माय थॉट (इं. शी. १९२९) ही वैचारिक पुस्तके व द स्ट्राँगेस्ट (इं. शी. १९२०) ही कादंबरी ख्यातनाम आहे. तो आपले आत्मचरित्र लिहीत होता, पण ते पूर्ण होण्यापूर्वीच पॅरिस येथे तो मरण पावला.

संदर्भ

[संपादन]

[]

  1. ^ Williams, Wythe. "The Tiger of France, Toronto". Cite journal requires |journal= (सहाय्य)