योसिफ ब्रोझ तितो
योसिफ ब्रोझ तितो | |
युगोस्लाव्हियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १४ जानेवारी १९५३ – ४ मे १९८० | |
मागील | इव्हान रिबार |
---|---|
पुढील | लाझार कोलिशेव्स्की |
युगोस्लाव्हियाचा २३वा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २ नोव्हेंबर १९४४ – २९ जून १९६३ | |
अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरसचिव
| |
कार्यकाळ १ सप्टेंबर १९६१ – ५ ऑक्टोबर १९६४ | |
पुढील | गमाल आब्देल नासेर |
जन्म | ७ मे, १८९२ कुम्रोवेक, ऑस्ट्रिया-हंगेरी (आजचा क्रोएशिया) |
मृत्यू | ४ मे, १९८० (वय ८७) युबयाना, युगोस्लाव्हिया |
राजकीय पक्ष | सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष |
सही |
योसिफ ब्रोझ तितो (सर्बो-क्रोएशियन: Јосип Броз Тито; ७ मे १८९२ - ४ मे १९८०) हा युगोस्लाव्हिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राधक्षपदावर १९५३ ते १९८० दरम्यान राहिलेला तितो १९४४ ते १९६३ दरम्यान देशाचा पंतप्रधान देखील होता.
जन्माने क्रोएशियन पेशाने लष्करी अधिकारी असलेल्या तितोच्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेतृत्वाखाली युगोस्लाव्हियामध्ये चालवली गेलेली नाझीविरोधी चळवळ युरोपामधील सर्वोत्तम मानली जाते. युद्ध संपल्यानंतर युगोस्लाव्हियाला राजतंत्रापासून साम्यवादी प्रजासत्ताकाकडे नेण्यात तितोचा मोठा वाटा होता. शीत युद्धकाळामध्ये तितोने तटस्थ राहणे पसंद केले व भारताचे जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे गमाल आब्देल नासेर तसेच इंडोनेशियाचे सुकर्णो ह्यांच्यासोबत अलिप्त राष्ट्रगट चळवळीची निर्मिती केली.
एक हुकुमशहा असला तरीही तितो युगोस्लाव्हियामध्ये व जगात प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे जनतेला संघटित करण्याचे कौशल्य वाखाणले जाते. त्याच्या धोरणांमुळे युगोस्लाव्हिया देश एकसंध व आर्थिक प्रगतीपथावर राहिला. तितोच्या मृत्यूच्या केवळ १० वर्षांनंतर युगोस्लाव्हियाचे विघटन झाले.
तितोला त्याच्या जीवनामध्ये एकूण ९८ जागतिक व २१ युगोस्लाव्हियन गौरव पुरस्कार व पदे मिळाली होती. भारत सरकारने १९७१ साली तितोला जवाहरलाल नेहरू पुरस्कार बहाल केला होता.