जेम्स विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जेम्स विल्सन

जेम्स विल्सन (इंग्लिश: James Wilson) (जून ३, १८०५ - ऑगस्ट ११, १८६०) हा स्कॉटिश मजूर पक्षीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ होते. ते स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेचे, तसेच द इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाचे संस्थापक होते. भारतात पहिल्यांदा प्राप्तिकर लावणारे हेच ते ग्रहस्त होय.

जीवन[संपादन]

हे भारतावरच्या ब्रिटिश राजवटीच्या काळातले हिंदुस्थानचे पहिले अर्थमंत्री होते. ३ जून १८०५ रोजी स्कॉटलंडमधील रॉक्सबर्गशायर परगण्यातील हॉइक(Hawic) या लहान गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लोकरीच्या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करीत. जेम्स विल्सनची आई त्याच्या लहानपणीच वारली होती. जेम्स विल्सन हा त्याच्याkm एकूण पंधरा भावंडातला चौथा. शाळेत विल्सन अत्यंत शांत, गंभीर आणि खेळाच्या मैदानापासून दूर राहणारा मुलगा होता. अभ्यासात त्याला उत्तम गती होती. लहनपणी विल्सनला वाचनाचा विलक्षण नाद लागला. आपण शिक्षक व्हावे असे त्याले वाटले.. वडिलांनी त्याला इसेक्स येथे अध्यापनशास्त्राच्या अभ्यासासाठी पाठवले. तिथे गेल्यावर त्याचा विचार बदलला. शिक्षक होण्यापेक्षा वडिलांच्या कारखान्यातला एक हरकाम्या नोकर व्हायला आवडेल असे त्याने वडिलांना कळविले. पुढे त्यांना वकिलीचा अभ्यास करावासा वाटला, पण तो योग आला नाही. वयाच्या सोळाव्या वषी विल्सनने हॅट तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. वडिलांनी त्याला हॅटचा एक चालू कारखाना विकत घेऊन दिला. त्यामुळे जेम्स विल्सन यांना स्कॉटिश हॅटर हे बिरुद कायमचे चिकटले. पुढे जेव्हा हिंदुस्थानात व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंगच्या मंत्रिमंडलात अर्थमंत्री म्हणून रूजू झाले तेव्हा ’द इंडियन पंच’ या नियतकालिकाच्या ऑगस्ट १८६० च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंग्यचित्रात, विल्सन, हे लॉर्ड कॅनिंगच्या डोक्यावर विविध करांच्या टोप्या घालून त्या नीट बसतात की नाही ते बघत आहेत असे दाखवले होते.

१८२४ मध्ये विल्सन हॉइक सोडून लंडनला आले आणि त्यांनी ’विल्सन आयर्विन ऍन्ड विल्सन’ ही भागीदारी पेढी वयाच्या विसाव्या वर्षी उभी केली व १८३६ मध्ये नुकसान झाल्याने विकून टाकली. इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या स्वस्त परदेशी धान्य-डाळी यांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे होते. त्यांना कॉर्न कायदे म्हणत. या कायद्यांच्या विरुद्ध विल्सनने ’मॅंचेस्टर गॉर्डियन’(सध्याचे गॉर्डियन)मध्ये लेखमाला सुरू केली. पुढे त्या लेखांची ’इन्फ़्लुएन्सेस ऑफ़ कॉर्न लॉज’(१८३९) नावाची पुस्तिका झाली. विल्सनच्या प्रयत्‍नांनी कॉर्न लॉज १८४६ मध्ये रद्द झाले. मुक्त व्यापाराच्या प्रसारासाठी विल्सनने ’द इकॉनॉमिस्ट’ हे वृत्तपत्र सुरू केले विल्सन त्याचा सोळा वर्षे एकमात्र संपादक होता. अजूनही ते वृत्तपत्र मानाचे आणि प्रतिष्ठेचे साप्ताहिक म्हणून जगात प्रसिद्ध आहे.

१८४७ ते १८५९ या काळात लिबरल पक्षाचा सभासद असलेला विल्सन इंग्लंडमध्ये हाउस ओफ़ कॉमन्सचा खासदार होता. १८५३ ते १८५८ विल्सन ब्रिटिश कोषागाराचा अर्थसचिव होता. १८५८ मध्ये त्याने ’चार्टर्ड बॅंक ऑफ़ इंडिया, ऑस्ट्रेलिया ऍन्ड चायन” सुरू केली. १८५९ साली स्टेन्डर्ड बॅंक ऑफ़ ब्रिटिश साउथ आफ़्रिका या बॅंकेबरोबर विलीनीकरण होऊन आजची स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅंक उदयाला आली. विल्सन बोर्ड ऑफ़ कंट्रोलचा सहसचिव असताना हिंदुस्थानविषयक घेतलेल्या अनेक आर्थिक निर्णयांत अप्रत्यक्ष सहभागी होता. लॉर्ड डलहौसी हिंदुस्थानात जे रेल्वेचे जाळे अंथरत होता त्या उपक्रमात विल्सनचा मोलाचा वाटा होता. १८५९ च्या नोव्हेंबर महिन्यात विल्सन बोटीने कलकत्ता येथे दाखल झाला आणि अर्थमंत्री झाला. पहिला अर्थसंकल्प त्याने राजधानी कलकत्याच्या कायदेमंडळात १८ फेब्रुवारी १९६० ला सादर केला. पहिल्या अर्थसंकल्पात तीन महत्त्वाचे कर सुचवले होते. प्राप्‍तिकर, परवानाकर आणि तंबाखूवरचा कर. मद्रासचा लोकप्रिय गव्हर्नर सर चार्ल्स ट्रॅव्हेलियन याने या करांच्या सूचनेवर टीकेची झोड उठवून विल्सनला सळो की पळो केले होते. अखेर, अर्थसंकल्प २१ जुलै १८६० ला पास झाला.

२०१० साली, त्या ब्रिटिश हिंदुस्थानच्या पहिल्या अर्थसंकल्पाला आणि पर्यायाने प्राप्‍तिकराला दीडशे वर्षे पूर्ण झाली. १८६० मध्ये सुचवलेले प्राप्‍तिकराचे दर असे होते. : सामान्य करदात्याला रुपये २०० पर्यंतचे वार्षिक उत्पन्‍न करमुक्त. २०० ते ५०० रुपयांपर्यंत २ टक्के प्राप्‍तिकर आणि ५०० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्‍न असणाऱ्यांना ३ टक्के प्राप्‍तिकर अधिक एक टक्का सार्वजनिक कल्याणकर. नाविक अधिकाऱ्यांचे २१०० रुपयांपर्यंतचे आणि पोलीस आणि सेनाधिकाऱ्यांचे ४९८० रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्‍न करमुक्त होते.

जेम्स विल्सन हे कॉर्न लॉज आणि तत्सम कायदे आणि चलनव्यवस्थेचे तज्‍ज्ञ होते. देशाला चांदीच्या जड नाण्यांच्या चलनातून मुक्त करून कागदी नोटांचे चलन सुरू करण्यास त्यांनीच पुढाकार घेतला होता. हिंदुस्थानात जेम्स विल्सन फक्त आठ महिने राहि्ले आणि १८६० सालच्या अर्थसंकल्पानंतर त्याच वर्षी म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी मरण पावले.

बाह्य दुवे[संपादन]