Jump to content

जुस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुस्ट : दोन अश्वारूढ सरदारांमधील द्वंद्वयुद्धाचा जुना पाश्चात्त्य प्रकार. यूरोपमध्ये सरंजामशाहीच्या काळात, सरदार म्हणून गणले जाण्यापूर्वी, जमीनदारांना आपल्या क्षात्रगुणाची चाचणी द्यावी लागे. त्यासाठी त्यांना द्वंद्वयुद्धांचा अनुभव प्राप्त करणे आवश्यक ठरे. राजाकडून सरदारकी मिळाल्यानंतर लढायांचा सराव ठेवण्यासाठी हे सरदार टूर्नामेंटमध्ये [ → टाटू व टूर्नामेंट] भाग घेत परंतु या टूर्नामेंटच्या विधिनियमांच्या चौकटीत राहून सरदारांना आपली युद्धांची रग जिरवणे कठीण जाई. शिवाय टूर्नामेंट म्हणजे केवळ श्रीमंतांची संमलनेच ठरू लागली होती. त्यामुळे जुस्ट हा द्वंद्वयुद्धप्रकार निर्माण झाला. राजघराण्यातील लग्नसोहळ्यांतही अशी द्वंद्वयुद्धे खेळली जात. युद्धप्रसंगी सरदार चिलखत घालीत, हे युद्ध बहुधा भाल्यांनी लढले जाई तर कधी कधी पू्र्वसंमतीने कुऱ्हाड, गदा इ. शस्त्रेदेखील वापरण्यात येत. जुस्ट खेळणारा घोड्यावरून पडला, की द्वंद्वयुद्ध संपत असे. सुंदर स्त्रिया आणि राजेरजवाडे यांचे लक्ष वेधून घेण्यासाठीही जुस्टमधील पराक्रम उपयोगी पडे. संरजामशाहीच्या अस्ताबरोबरच ही सरदारी द्वंद्वयुद्धेही लोप पावली.