Jump to content

जयदेव हट्टंगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयदेव सुब्बराव हट्टंगडी ( २८ ओगस्ट १९४८ - ५ डिसेंबर २००८ ) हे मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक होते. पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडून त्यांनी नाट्यदिग्दर्शनाचे धडे घेतले. त्यानंतर जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या ’राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा-NSD) दाखल झाले तिथून त्यांनी नाट्यशास्त्राची पदवी घेतली. यावेळी इब्राहिम अल्काझी त्यांचे गुरू होते.

कारकीर्द

[संपादन]

जयदेव हट्टंगडी यांची नाट्य कारकीर्द ’आविष्कार’ या नाट्यसंस्थेतून सुरू झाली. त्या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीवर केलेल्या ’चांगुणा’ या नाटकामुळे हट्टंगडी प्रसिद्धीस आले. ‘आविष्कार’मध्ये असताना जयदेव हट्टंगडींनी ’चांगुणा’खेरीज, ’गौराई’, ’पोस्टर’, ’भिंत’, ’मेडिया’, आणि ’सोनेरी शहामृगाचा वग’, आदी नाटके दिग्दर्शित करून सादर केली.

इ.स.१९xx मध्ये हट्टंगडी यांनी स्वतःची,’कलाश्रय’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. या नाट्यसंस्थेने ’अपराजित’ (मराठी-हिंदी), ’एवं इंद्रजित’(हिंदी)आणि ’वाडा भवानी आईचा’ ही नाटके प्रायोगिक रंगभूमीवर आणली. ’कलाश्रय’च्या स्थापनेनंतरसुद्धा, जयदेव हट्टंगडी हे ’आविष्कार’चे अविभाज्य घटक राहिले.

जयदेव हट्टंगडी हे आधी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकवीत. नंतर ते मुंबई विद्यापीठाच्या ’अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्‌स’ या नाट्यशास्त्र विभागात अध्यापन करू लागले. त्या काळी महाराष्ट्रात नाट्यशिक्षण देणारे ते एकमेव शिक्षक होते.

जयदेव हट्टंगडी यांची नाट्यपरीक्षक म्हणून कारकीर्द फार मोठी होती. ’आविष्कार’ नाट्यसंस्थेचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्याचमुळे संस्थेचे नाट्यशिक्षणाचे उपक्रम यशस्वी झाले. त्यांच्यासारखा दुसरा नाट्यपरीक्षक विरळाच. त्या संस्थेत हट्टंगडी वर्षाला दोन नाट्यशिबिरे घ्यायचे. या शिबिरांमधून त्यांनी कितीतरी नाट्यकलावंत घडवले. इ.स. १९७४पासून ते अगदी मरेपर्यंत हट्टंगडींनी हे काम केले.

अभिनय

[संपादन]

जयदेव हट्टंगडींनी खालील नाटकांतून भूमिका केल्या :

मराठी :

  • धंदेवाईक
  • मालकीण मालकीण दार उघड
  • ययाती
  • शय्या
  • शांतता कोर्ट चालू आहे

हिंदी :

  • आख़री शमा
  • आधे अधुरे
  • इबारागी
  • जसमा ओड़न
  • तुघलक
  • दान्ताकी मौत
  • प्रेत (घोस्ट्‌स)
  • बिच्छू
  • भूख़े नाविक
  • मैं आग होता हूॅं
  • सुलतान रझिया
  • स्टील फ्रेम

अवांतर

[संपादन]

हिंदी-इंग्रजीतील अ‍ॅटनबरो-दिग्दर्शित गांधी चित्रपटात कस्तुरबांची भूमिका, आणि इतर असंख्य हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या रोहिणी हट्टंगडी या जयदेव हट्टंगडींच्या पत्‍नी होत.

चालता बोलता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयदेव हट्टंगडी, यांचे वयाच्या साठाव्या वर्षी कॅन्सरने निधन झाले.