चोंभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चोंभा : (चौदावे किंवा पंधरावे शतक). एक मराठी आख्यानकवी होता. रंगनाथस्वामी निगडीकरच्या संतमालिकेत त्याचे नाव आढळते. त्याने लिहिलेले 'उखाहरण' हे आख्यानकाव्य प्रसिद्ध आहे. मुळात हे काव्य सुमारे अडीच हजार ओव्यांचे आहे. त्यातील अंदाजे सव्वासहाशे ओव्याच आधी उपलब्ध झाल्या होत्या. तथापि डॉ. यू.म. पठाण ह्यांना हे संपूर्ण काव्य आता मिळाले असून ते त्यांनी संपादिले आहे. मराठवाडा विद्यापीठातर्फे हा ग्रंथ प्रकाशित झाला.. या कवीच्या ओव्या रचनेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उदा., काही ओव्यांत पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या चरणांच्या शेवटी यमक असून तिसरा चरण निर्यमक असतो, तर काही वेळा संपूर्ण ओवीच निर्यमक लिहिलेली आढळते. पूर्वी उपलब्ध झालेला उखाहरणाचा भाग वि.का. राजवाडे ह्यांनी संपादिला असून तो भारत इतिहास संशोधन मंडळाच्या १९११ च्या इतिवृत्तात प्रसिद्ध झालेला आहे. प्राचीन मराठी आख्यानक काव्यपरंपरेत 'उखाहरणा'ला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. काव्यदृष्ट्या हे आख्यानकाव्य उत्कृष्ट असून त्यात यादवकालीन मराठीची लक्षणीय वैशिष्ट्ये आढळतात.