चांदकुडा
चांदकुडा (किंवा चांदला, करवत, जासुंद) हा भव्य, ७०-८० मीटर उंच व नऊ मीटर घेराचा महान वृक्ष ब्रह्मदेश, श्रीलंका, इंडोनेशिया (जावा), मलेशिया आणि भारत (कोकण, कारवार, खंडाळा) या देशांतील सदापर्णी जंगलात सापडतो.
चांदकुडाची विविध भाषेतील नावे :
- हिंदी - चांदकुडा
- कानडी - अजनपत्ती
- संस्कृत : वल्कल
- इंग्रजी - सॅक ट्री, यूपस ट्री. ॲन्टिआर,
- शास्त्रीय नाव - ॲंटिॲरिस टॉक्सिकॅरिया
या झाडाच्या खोडाला बुंध्याजवळ अनेक आधारमुळे असतात. साल गर्द करडी, कठीण व गुळगुळीत असते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, खरबरीत, लंबगोलाकृती व लांबट टोकाची असतात. फुले एकलिंगी असून सप्टेंबर-ऑक्टोबरात एकाच झाडावर येतात. नरपुष्पे (पानांच्या बगलेत), सवृंत, पुष्पासनावर गर्दीने उगवलेली व मादीपुष्पे एकाकी व छदमंडलाने वेढलेली असतात.
पुंपुष्पात चार संदले व तीन ते आठ केसरदले आणि स्त्री-पुष्पात दोन किंजले असतात. फळे लाल, मखमली सालीची, मांसल, एकबीजी, लहान (१.२ - १.८ सेंमी.) व कुंभाकृती असतात.
वृक्षाच्या सालीपासून जाड धाग्याचे कापड, पोती आणि दोऱ्या बनवितात.
या झाडाचा चीक अत्यंत विषारी असून बाणांच्या टोकांस लावतात. लाकूड व हस्तिदंत घासून गुळगुळीत करण्यासाठी पाने वापरतात. बिया कडू व ज्वरनाशक असून आमातिसारावर उपयुक्त असतात. सालीतील धागा कागद-निर्मितीत उपयुक्त आहे.