चर्चा:राजाराम भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजाराम हायस्कुल[संपादन]

१८६६ साली छत्रपति शिवरायांच्या गादीवर छत्रपति राजाराम महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी अभिषिक्त झाले. राजाराम महाराज हे अत्यंत हुशार, जिज्ञासू व लोककल्याणकारी वृत्तीचे होते. महाराजांना अस्खलित इंग्रजी बोलता येत असे. महाराज शिक्षणाचे भोक्ते होते. आपल्या प्रजेस सक्षम बनवायचे असेल, तर त्यासाठी 'शिक्षण' हा एकमेव पर्याय आहे, याची महाराजांस पूर्ण जाणीव होती. यासाठी आपल्या राज्यातील विद्यार्थांना प्राथमिक शिक्षणानंतरील पुढचे शिक्षणही घेता यावे यासाठी महाराजांनी कोल्हापुरामध्ये एक अद्ययावत हायस्कूल स्थापन करण्याची घोषणा केली. हायस्कूलच्या इमारतीसाठी योजना व पूर्वतयारी झपाट्याने होत गेली व जुन्या राजवाड्याजवळच दि. १५ फेब्रुवारी १८७० रोजी सायंकाळी साडे पाच वाजता स्वतः महाराजांच्या हस्ते इमारतीचा पायाभरणी समारंभ पार पडला. हायस्कूलच्या इमारतीचा नकाशा व अंदाजपत्रक इंजिनियर मँट यांनी बनविले होते. पायाभारणी समारंभाच्या भाषणात महाराज म्हणतात, " ज्या इमारतीचा शिलान्यास मी करीत आहे त्या इमारतीने कोल्हापूर शहरास मोठी शोभा प्राप्त होणार आहे. अशी सुंदर इमारत विद्यादानाच्या कार्यात उपयोगी पडणार याबद्दल मला विशेष आनंद वाटतो. सध्या विद्येस किती मान मिळत आहे याची ही सुंदर इमारत कायमची साक्ष राहील. विद्यावृद्धी हे किती महत्त्वाचे काम आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे. म्हणून विद्यावृद्धीपासून प्रजेला फायदे मिळवून देण्यासाठी मी जास्तीतजास्त प्रयत्न करीन, असे आपणांस खात्रीपूर्वक सांगतो. मला आशा आहे की, शिक्षणप्रसाराच्या महत्त्वाच्या कामाला अलीकडे जे प्रोत्साहन देण्यात आले आहे, ते अल्पकालीन ठरणार नाही. लोकांच्या जुन्या समजुती नाहीशा होत जातील व विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल, तसतसे शिक्षणप्रसाराच्या कार्याला अधिक भर आणि दृढता येईल."

पायाभरणी समारंभानंतर इमारतीचे बांधकाम वेगाने सुरु झाले. मात्र दुर्दैवाने पुढच्या साडे नऊ महिन्यांतच महाराजांचा अंत झाला. कोल्हापूर राज्याच्या या दूरदर्शी छत्रपतिने इटली येथे अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरामध्ये मान्यवरांनी व प्रजेने जाहिर सभा घेऊन महाराजांना श्रद्धांजली वाहिली व महाराजांनी सुरु केलेल्या हायस्कूलला त्यांचेच नाव देण्याचा ठराव करण्यात आला.

पुढे काहीच वर्षांत कोल्हापूर शहराच्या मध्यमागी व छत्रपतींच्या राजवाड्यालगतच खुद्द छत्रपतींच्या राजवाड्याहूनही देखणी, आधुनिक व अति उत्कृष्ट स्थापत्यशैलीची एक भव्य व राजेशाही इमारत उभी राहिली. राजेशाही थाटाची हि इमारत राजाच्या शानशौकीसाठी म्हणून नव्हे, तर राजाच्या दूरदृष्टीचे प्रतीक म्हणून उभी राहिली. ज्या शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले त्या शिवरायांच्या वारसदाराने त्या स्वराज्याचे सुराज्य बनविण्याच्या दिशेने उचललेल्या पावलाचे हे मूर्तिमंत प्रतीक होते. छत्रपतींच्या इच्छेनुसार या इमारतीमध्ये एक अत्यंत अद्ययावत हायस्कूल सुरु करण्यात आले व कोल्हापूरच्या रयतेने या हायस्कूलला नाव दिले, "राजाराम हायस्कूल."

राजाराम महाराजांनी सुरु केलेल्या या हायस्कूलमधून अनेक विद्यार्थी शिकले. अनेक मोठे नेते, विचारवंत, क्रांतीकारक या हायस्कूलने घडविले. या हायस्कूलची हि भव्य इमारत छत्रपति महाराजांची खासगी मालमत्ता होती. पुढे छत्रपति शाहू महाराजांनी याचा कारभार आर्य समाजाकडे सोपवला. शाहू महाराजांनंतर त्यांचे पुत्र छत्रपति राजाराम महाराजांनी तो परत दरबारच्या ताब्यात घेतला व या इमारतीमध्ये सायन्स कॉलेजही सुरु केले. करवीर राज्याच्या विलीनीकरणानंतर हि भव्य इमारत परत एकदा छत्रपति महाराजांची खासगी मालमत्ता झाली, पण १९७२ च्या दरम्यान छत्रपति शहाजी महाराजांनी इमारतीमध्ये सुरु असणाऱ्या हायस्कूलचा कारभार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सोपविला. आजही या इमारतीमधून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. भालचंद्र घोलकर (चर्चा) १२:४६, ११ मार्च २०१८ (IST)