चर्चा:बाहुभूषणे
मंत्रसिद्ध ताईत व तत्सम वस्तूही दंडात बांधण्याची प्रथा आहे. त्यांतही अनेकदा अलंकरणाची दृष्टी दिसून येते. दागिन्यांचा हा प्रकार सार्वत्रिक नाही तथापि काही हस्तभूषणांचा वापर मात्र सामान्यतः सार्वत्रिक असल्याचे दिसून येते हस्तभूषणे. प्राचीन ईजिप्तमध्ये बाहुभूषणे वापरण्याची प्रथा होती. श्रीमंत रोमन स्त्रियाही बाहुभूषणे वापरीत असत. भारतात स्त्री व पुरुष ही दोघेही बाहुभूषणांचा वापर प्राचीन काळापासून करीत असल्याचे दिसून येते.
अजिंठा लेण्यातील स्त्रियांच्या बाहुभूषणांवर फुलांची नक्षी असून त्यांना मोत्याचे सर लावलेले आढळतात तसेच फासेही असत. खजुराहो शिल्पातील स्त्रियांची बाहुभूषणे फुलांच्या आकृतिबंधांचे असून त्यात एकपदरी किंवा अनेकपदरी गोलाकार अंगद व केयूर हे प्रकारही दिसून येतात. साधी बाहुभूषणे प्रायः गोलाकार व पौची (वेलदोडा) आकाराच्या मण्यांची असून त्यांच्या आकार-प्रकारांत खूपच वैविध्य असे. यांमध्ये मण्यांची एककेंद्री वर्तुळे, वेलबुटी, साधी पट्टी किंवा बाह्य उठावदार नक्षी दिसून येते तसेच शंक्वाकार नक्षी असलेली धातूंच्या पट्ट्यांची बाहुभूषणेही आढळून येतात. त्यांचा वापर बहुधा उच्चवर्गीय स्त्री-पुरुष करीत. देवदेवतांच्या मूर्ति-चित्रांतूनही ती दिसून येतात. सामान्य नागरजन, गायक, वादक, नर्तक, शिकारी इ. लोकांत साध्या बाहुभूषणांचा वापर प्रचलित होता.
रामायण-महाभारत, कालिदासाचा रघुवंश, बाणभट्टाची कादंबरी इ. प्राचीन साहित्यातून केयूर आणि अंगद या बाहुभूषणांचे उल्लेख आढळतात. बाहुभूषणांचे प्रमुख प्रकार हेच होत. त्यांचा वापर स्त्री व पुरुष दोघेही करीत. ते रत्नजडित सुवर्णाचे असून त्यांच्या दोन्ही टोकांना सिंहादी पशुमुखे जडविलेली असत. तसेच दोन्ही टोकांना रेशमी लड्या वा गोंडे लावण्यात येत. त्यांचा आकृतिबंध वेलीप्रमाणे वा मकराकृती असे. त्यांची वरची बाजू टोकदार असून त्यात उत्तरीय अडकणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असे. केयूर व अंगद यांत फरक एवढाच की केयूराला गोंडा असे व अंगदला तो नसे. शिवाय सबंध अंगदावर जडावकाम केलेले असे व तो दंडावर घट्ट बसत असे. यांखेरीज नानाविध मणी, ताईत व पेट्या जोडून तयार केलेला ‘पंचका’, रत्नजडित सुवर्णाचा व पौनीसदृश आकाराचा कट वा कतक तसेच रेशमी गोफातील नवरत्न इ. बाहुभूषणे दिसून येतात. आधुनिक काळात केयूरसदृश भासणारा रुंद रेशमी पट्टीवरील बाजूबंद आजूबाजूला नऊ खडे बसविलेला नौनाग, सहा लंबगोलाकार खड्यांनी युक्त जौशान, पातळ पण मोठी सुवर्णपट्टी असलेला अनंत, चौकोनी सुवर्णाचा भावत्त आणि तांब्या-पितळेचे मंत्रतंत्रयुक्त लंबवर्तुळाकार ताईत व चांदीच्या चौकोनी पेट्या इ. प्रकार प्रचलित आहेत.
याखेरीज प्रदेशपरत्वे आपले वेगळेच वैशिष्ट्य दाखविणारी काही बाहुभूषणेही वापरली जातात. राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र व महाराष्ट्र येथील बाहुभूषणे अशीच वैविध्यपूर्ण आहेत. गुजरातमध्ये सोन्यारुप्याची तार काढून तीपासून बनविलेली व मधोमध मणी असलेली वाकी वापरण्याची प्रथा आहे तर राजस्थानात सोन्या-चांदीच्या पट्टीत खाचा पाडून व त्या लहान लहान पट्ट्या एकसंध करून फासा बसविलेले बाजूबंद वापरण्यात येतात. या बाजूबंदांच्या आत गादीवजा कापडी अस्तर लावलेले असते. महाराष्ट्रातील वाकी तशी साधीच पण वेधक असते. ही वाकी सोन्या वा चांदीच्या तारेपासून बनवून तिच्या मधोमध मोठा हिरवा अथवा तांबडा खडा बसवून तयार करण्यात येते. या नागमोडी वाकीला पीळ व खिळही लावलेला असतो.
Start a discussion about बाहुभूषणे
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve बाहुभूषणे.