चंदाताई तिवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

चंदाताई तिवाडी या महिला भारूडकार १९८२ पासून भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत.[ संदर्भ हवा ]

सोळाव्या शतकात संत एकनाथ महाराजांनी समाजातील सर्व थरांतील लोकांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी आणि त्याद्वारे समाजप्रबोधन करण्यासाठी प्राणी, पक्षी, वासुदेव, जोशी, पोतराज, सौरी, वाघ्या-मुरळी, जंगम, भुत्या, दादला अशा अनेक रूपकांवर भारुडे रचली. अशाच रचना करून चंदाताई तिवाडी यांनीही तळागाळातील लोकांना आदर्शाची शिकवण देत समाज जागृती केली. संत एकनाथांचा वारसा घेतलेल्या चंदाबाईंनी, त्यांच्या अंगी उत्तम अभिनयकला असल्याने, प्रसंगी विनोदाच्या अवगुंठनातून, तर कधी मार्मिक दाखले देत उपहासाच्या आधारे त्या सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या अनेक विषयांचे विवेचन करतात. त्यांना नृत्य, संगीत आणि रसाळ निरूपणाचीही खणखणीत जाण असल्याने त्यांच्या भारुडात बायाबापडे गुंग होऊन जातात. वण्र्यविषयाची खोल समज, सादरीकरणातील नाटय़मयता आणि लोकमानसाची नस सापडलेल्या चंदाताई भारूडांतून केवळ भक्तिमार्गाचीच थोरवी सांगत नाहीत, तर त्यातून समाजातील प्रचलित अनिष्ट प्रथा-परंपरांवरही त्या प्रहार करतात. आजवर त्यांनी दारू, गुटखा, एड्स, कुटुंबनियोजन, पाणीप्रश्न, कृषी-योजना, राष्ट्रीय एकात्मता, महिला स्वातंत्र्य, भ्रूणहत्या असे अनेक विषय भारुडातून हाताळले आहेत.

केवळ भारुडातून समाजप्रबोधन करण्यावरच त्यांनी समाधान मानले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी ते साकारण्याचा प्रयत्‍न केला. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातील अन्न आणि वस्त्राची गरज माणूस कशीबशी भागवण्याचा प्रयत्‍न करतो. परंतु त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. गरीब व शोषितांसाठी स्वतःचे घरकुल हे आयुष्यभर निव्वळ स्वप्नच राहते. म्हणूनच चंदाताईंनी पुढाकार घेऊन १९८१ साली पंढरपूरनजीक गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर जमीन उपलब्ध करून दिली आणि स्थानिक आमदार सुधाकर परिचारक यांच्या सहकार्याने तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या मदतीने प्रत्येकी केवळ २८ हजार रुपयांत त्यांनी तळागाळातील दीडशे गरजूंना वीज-पाणी आदी सोयींसकट त्यांच्या मालकीची होतील अशी घरे बांधून दिली. या वस्तीत राहणार्‍यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी समाजातील काही प्रतिष्ठितांच्या मदतीने त्यांनी गंगाई शिक्षणप्रसारक मंडळाची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे गोपालपुरात श्रीगोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले. पाचवी ते दहावीच्या मुलांची त्यामुळे मोठीच सोय झाली. या विद्यालयात सध्या अडीचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चंदाताई स्वतः या शिक्षण कमिटीच्या अध्यक्ष असून, कार्यकारिणीच्या सर्व सदस्य महिलाच आहेत. या शाळेत औपचारिक शिक्षणाबरोबरच ज्ञानेश्वरीचे पारायणही करवून घेतले जाते.

याबरोबरच गृहिणींना आपल्या संसाराला थोडाफार तरी आर्थिक हातभार लावता यावा म्हणून त्यांना बँक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवून देऊन शिलाई मशिन्स घेऊन देण्यात चंदाताईंनी पुढाकार घेतला. महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन त्यांना सक्रिय करण्याचा चंदाताईंचा मानस त्यात होता. आज अनेक होतकरू महिला या शिलाई मशिनांवर परकर शिवून करून अर्थार्जन करीत आहेत.

चंदाताईंचे हे कार्य सर्वत्र वाखाणले गेले असून, त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.

भारूडरत्‍न चंदाताई तिवाडी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • वसंत सोमण मित्रमंडळातर्फे वसंत सोमण स्मृति पुरस्कार (२०१०)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • अशोक परांजपे स्मृति पुरस्कार (१६-७-२०१६)