ग.कृ. गर्दे
डॉ. गणेश कृष्ण गर्दे (सप्टेंबर, इ.स. १८८५ - २ जुलै, इ.स.१९१६) हे मराठी लेखक होते. यांचे मूळ गाव बेळगाव-धारवाडकडचे असून त्यांचे वडील वैद्य होते. गणेश कृष्णाजींचे माध्यमिक शिक्षण बेळगावी झाले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी ग्रॅंट मेडिकल कॉलेजातून इ.स. १८७८मध्ये एल.एम.एस. ही डॉक्टरी परीक्षा प्रथम ष्रेणीत उत्तीर्ण केली आणि ते पुण्यात व्यवसाय करू लागले. गर्दे यांना आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचेही ज्ञान होते. शिवाय त्यांना संस्कृत साहित्याची आणि मराठी वाङ्मयांत रस होता. डॉक्टरी करता करता त्यांनी मराठी भाषेत वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. ’वाग्भट’ व ’माधव निदान’ हे दोन संस्कृत ग्रंथ गर्दे यांनी मराठीत आणले. मराठीत ते ’सार्थ वाग्भट - अष्टांगहृदय व त्याचे मराठी भाषांतर भाग १-२ (इ.स. १८९०-९१) आणि ’सार्थ माधवनिदान’ (इ.स. १९०४) या नावांनी प्रकाशित झाले. ह्या दोन्ही ग्रंथांना जोडलेल्या उपोद्घा्तांत त्यांनी आर्यवैद्यकाचे मोठ्या चिकित्सेने पर्यालोचन केले आहे. ’माधव निदान’ या ग्रंथात इंग्रजी पद्धतीनुसार अनेक रोगांची निदाने दिली असून, ग्रंथात शरीरविज्ञानासंबंधी एक निबंधही जोडला आहे. आयुर्वेद अभ्यासक्रमात हे दोनही ग्रंथ प्रमाण मानले जातात.
वैद्यकीय विषयांना वाहिलेल्या ग्रंथांखेरीज ग.कृ. गर्दे यांनी इतरही काही संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर केले. सटीप ईशगुणादर्शः (१९१९), सार्थ व समश्लोकी शिवमहिम्न व उपमन्युकृत शिवस्तोत्र (१९०५) ही त्यांची संस्कृतवरून मराठीत पद्यरूपात आणलेली काव्ये होत. ह्या काव्यांवरून गर्दे यांची काव्यशक्ती, भाषाप्रभुत्व व निर्दोष छंदरचना यांचा प्रत्यय येतो. विष्णूसहस्रनामातील प्रत्येक नावावर एक याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र श्लोकही रचले होते.
साहित्य आणि संस्कृतीविषयी आवड असल्याने डॉ. ग.कृ. गर्दे यांना पुण्यात आल्यावर लोकमान्य टिळक यांच्याशी संबंध आला. त्यांच्या मैत्रीमुळे गर्दे यांनी राजकारण, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम यांत सह्भाग घ्यायला सुरुवात केली. ते टिळकांनी सुरू केलेल्या ’केसरी’ या वर्तमानपत्राचे सुरुवातीच्या संस्थापक पुरस्कर्त्यांपैकी एक होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवात ते व्याख्याने देत. टिळकांचे ते वैद्यकीय सल्लागार होते.
डॉ. गणेश कृष्णाजी गर्दे यांच्या चौफेर व्यासंगामुळे त्यांना पुणे येथे १९०९ साली भरलेल्या ५व्या मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.