ग्रेगरीय दिनदर्शिकेचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आहे. निदान गेली शंभर वर्षे सगळे आंतरराष्ट्रीय कारभार ग्रेगरीय दिनदर्शिका वापरून चालत आहेत.

प्रसिद्ध रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४५ मधे आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. त्यापूर्वी रोममधे प्रचलित असलेल्या दिनदर्शिकेप्रमाणेच ती दिनदर्शिका पृथ्वीच्या सूर्यभ्रमणावर अधिष्ठित होती, पण तिच्यातली कालमापनपद्धत सीझरच्या सल्लागारांनी बऱ्यापैकी सुधारलेली होती. पुढे ५७० वर्षांनी डायोनिसीअस एग्झिगस नावाच्या (सद्यः रोमेनिया ह्या नावाने ओळखल्या जाणार्या प्रदेशातल्या) एका वजनदार मठवासीने त्यावेळच्या समजुतीनुसार येशू क्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला होता असे धरून तेव्हाचा जू.स. ५७० लोकांनी ई. स. ५२५ मानावा असे सुचवले. ती सूचना ह्ळूह्ळू युरोपीय लोकांनी स्वीकारली. इ.स. १५८२ पर्यंत ज्युलियन दिनदर्शिकेमागे असलेली कालमापनपद्धतच वापरण्यात येत असे, पण तिच्यात बरेच दोष उरले होते.

तेव्हा इ.स. १५८० मधे रोममधल्या क्रिस्ती धर्मगुरू पोप तेराव्या ग्रेगरींनी विद्वानांचे एक मंडळ स्थापून त्या मंडळावर कालमापनपद्धत निर्दोष करण्याची जबाबदारी सोपवली. त्या मंडळाच्या शिफारसींनुसार इ.स. १५८२ मधे सद्यःची ग्रेगरीय दिनदर्शिका वापरायला रोममधे, हळूहळू यूरपखंडात, आणि मग सगळ्या जगात सुरवात झाली.ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसारचे एक वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूकपणे असावे त्यापेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिक लांबच आहे! म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या शंभराव्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल!


पण ४०० वर्षांपूर्वी पोप ग्रेगरींनी नियुक्त केलेले खगोलशास्त्रज्ञ सॊरवर्षाचे कालमान केवळ सरासरी २६.३ सेकंदांच्या अगदी किरकोळ फरकाने चुकावेत ह्या गोष्टीत दिसणारे त्यांचे खोल ज्ञान फार कौतुकाचे निःसंशय आहे.

पहा: कालमापन