ग्रामीण वसाहती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्वी जी गावे वसलेली ती शेटे-महाजनांनी राजाज्ञेने वसवली. सरकारचा हुकूम झाला की ही मंडळी एखाद्या ओसाड जागी जायची. त्यांच्याजवळ सरकारचे अभयपत्र असायचे. तेवढ्या भरंवशावर लोक तिथे येऊन वसती करायचे. मराठेशाहीत युद्धामुळे अशी अनेक गावे उध्वस्त व्हायची, आणि मग शेटे-महाजनांमुळे परत वसायची. अशा रीतीनी खोरीच्या खोरी त्यांनी वसवली. पुण्याच्या सदाशिव, नारायण, नाना या पेठा अशाच शेटे-महाजनांनी वसवल्या. त्याबद्दल त्यांना गावकऱ्यांकडून तेल, पासोड्या, विड्याची पाने यासारख्या गोष्टी वर्षभर फुकट मिळायच्या.

गाव वसताना तेथे शिंपी, तेली, तांबोळी, कोष्टी, गवंडी, कासार, पिंजारी आणि रामोशी येतील हे पाह्यले जायचे. एकदा ही मंडळी जमली की अनेक भटक्या जमातीच्या लोकांची गावात ये-जा सुरू व्हायची. कोष्ट्याकडून कापडे विकत घेऊन गावकरी शिंप्याकडून कपडे शिवून घ्यायचे. तेल्याने घरी घाणा चालवून करडई, तीळ, शेंगादाणा, जवस अशा प्रकारची तेले काढायची आणि ती गावोगाव विकायची. कासार घोड्यावरून गावोगाव मुली-बायकांना बांगड्या विकून यायचे आणि त्याबदल्यात धान्य मिळवायचे. अशा रितीने एकदा गावगाड सुरळीत सुरू झाला की शेट-महाजन त्या गावात त्यांच्यापैकी एखाददोन माणसे ठेवून दुसऱ्या ठिकाणी गाव वसवायला जायचे.


पहा : गावकामगार