ग्रंथपट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रंथपट्टी : (बुकप्लेट). एखाद्या ग्रंथाची मालकी दर्शविणारी नक्षीदार पट्टी. ही बहुदा ग्रंथवेष्टनाच्या आतील बाजूस लावण्यात येते. कधीकधी ती मुखपृष्ठाबरोबरच मलपृष्ठाच्या आतील बाजूसही लावल्याचे उल्लेख आढळतात. या ग्रंथपट्टीवर विविध प्रकारे नक्षीकाम करण्यात येत असून त्या नक्षीमध्ये तो ग्रंथ बाळगणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा निर्देश केलेला असतो. ग्रंथपट्टीवरील नक्षीकाम कधी काष्ठठसे, खोदकाम किंवा कोरीवकामाच्या द्वारे, तर कधी अम्लउत्कीर्णन किंवा शिलारेखनाच्या द्वारे करण्यात येते. अलीकडे ते छायाचित्रणाद्वारेही नक्षीकामाच्या प्रतिकृती उठवून केलेले दिसून येते.

इतिहास[संपादन]

ग्रंथपट्टीची मूळ कल्पनाच पाश्चिमात्त्य जगातील असून तिचे मूळ जर्मनी देशात आहे. ग्रंथपट्टीची सुरुवात नेमकी केव्हा झाली हे सांगणे कठीण असले, तरी १४५०—७० च्या दरम्यानच्या काळातील ग्रंथपट्टीनिर्मितीची

उदाहरणे आढळतात. योहानेस नाबेन्सबुर्ख, हिल्डेब्रांट ब्रांडेनबुर्ख व व्हिल्हेम फोन त्सेल या तिघांनी बनविलेल्या ग्रंथपट्ट्या याच काळातील असून त्या आद्य ग्रंथपट्ट्या समजल्या जातात. जर्मनीप्रमाणे सोळाव्या शतकात फ्रान्स, इंग्लंड, इटली, स्वीडन, हॉलंड, इ. यूरोपीय देशांत व अठराव्या शतकात अमेरिकेमध्येही ग्रंथपट्टी तयार होऊ लागली होती. ही ग्रंथपट्टी त्या काळी विविध प्रकारांनी तयार करण्यात येत असे. जर्मनीतील ग्रंथपट्टी अगदीच साधीसुधी असे तर त्या मानाने इंग्लंडमधील ग्रंथपट्टी थोडीशी कलापूर्ण असे. कधीकधी ती शस्त्रसंभारयुक्त असून त्यावर अलंकारविरहित एक साधी ढाल कोरण्यात येई, तर कधी शिरस्त्राण व त्या भोवती प्रमाणबद्ध तुऱ्यांचे आच्छादन असे आणि त्याखालील गुंडाळीवर ग्रंथ धारकाचे नाव किंवा एखादे बोधवाक्य उठविण्यात येई. पुढे अठराव्या शतकामधील ग्रंथपट्टी त्या मानाने अधिक नक्षीकामयुक्त झाली. ह्या प्रकाराला, ‘जॅकोबीन’ अशी संज्ञा मिळाली होती. या ‘जॅकोबीन’ वरील ढालीभोवती खवल्याच्या माशांच्या आकृत्या किंवा जाळीदार नक्षीकाम केलेले असे. ग्रंथपट्टीवरील नक्षीकामाच्या दुसऱ्या प्रकाराला ‘चिपेंडेल’ म्हणत. चिपेंडेलवरील नक्षीकामात अखंड ढाल नसे, तर सुशोभित वक्राकार वर्तुळांनी ती खंडित केलेली असे. त्यामुळे तिला निवडुंगाचा तिरकस आकार प्राप्त होई व ते नक्षीकाम एकप्रकारचे शुक्तिशिल्पनच वाटे. अशा ढालीभोवती कारागीर परंपरागत रचनाबद्ध फुलांच्या माळेऐवजी नैसर्गिक स्वरूपाच्या पाना-फुलांच्या डहाळ्या कोरीत असत. या नक्षीकामाच्या प्रकाराची सुरुवात प्रथम फ्रान्समध्ये झाली व नंतर तिचा प्रसार जर्मनीत व अन्य यूरोपीय देशांमध्ये झाला. या ग्रंथपट्टीवर कधीकधी एखादे भाकीत, ऐतिहासिक किंवा प्रतिकात्मक स्वरूपाचा अभिप्राय, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा किंवा बोधवाक्य उठविण्यात येत असे. या बोधवाक्यातून बहुधा ग्रंथकाराच्या व्यवसायाचेही सूचन होत असे.

मान्यता[संपादन]

अशा प्रकारच्या ग्रंथपट्टीवरील नक्षीकाम म्हणजे एक कलात्मक आविष्कारच असतो. तो जगातील नामांकित कलाकाराने त्यावर अविष्कृत केलेला असतो. आल्ब्रेख्त ड्यूरर या प्रख्यात जर्मन कलाकाराने ग्रंथपट्टीवर उठविलेल्या कलाकृती अत्युत्कृष्ट म्हणून गणल्या जात. त्याच्यानंतर इतरही अनेक नामांकित कलाकारांनी आपापले वेगवेगळे आकृतिबंध ग्रंथपट्टीवर उठविले आहेत आणि तेही सर्वमान्य झाले आहेत. ग्रंथपट्टीवरील हे आकृतिबंध किंवा तिच्या आकाराबाबत कोणताही निश्चित स्वरूपाचा नियम नाही. दुपत्री (फोलिओ) कागदापासून तर अतिलहान चिटोऱ्यांपर्यंतच्या सर्व आकारांत ग्रंथपट्टी तयार करण्यात येते. तसेच त्यावर कलाकाराला हव्या त्या मोहक व आकर्षक आकृतिबंधाचा आविष्कारही करता येतो. तसेच ही ग्रंथपट्टी शुभ्र किंवा रंगीत कागदावर मुद्रित करून किंवा उत्तम चर्मपत्र, कमाविलेले कातडे अथवा एखाद्या धातूच्या तुकड्यावरही नक्षीकाम करून तयार करता येते. अलीकडील काळात छायाचित्रणाच्या साह्याने चित्राकृतियुक्त ग्रंथपट्टीची निर्मिती सुलभतेने होऊ लागली आहे. तिच्यातील आकर्षकता व नावीन्य प्रत्यही वाढत जाऊन हौशी लाकांचे ते एक आकर्षणच ठरत आहे. ग्रंथपट्टीच्या या हौसेमधूनच काही छांदिष्ट लोक पुरातन ग्रंथपट्ट्यांचा संग्रह करीत असतात. परस्परांच्या ग्रंथपट्ट्यांची आपापसांत देवाण-घेवाण करून ते आपल्या ग्रंथपट्टी—संग्रहात भर घालण्यात सदैव प्रयत्नशील असतात. जे. बी. एल्. वॉरेन या पाश्चात्त्य विद्वानाने तर त्या काळी ग्रंथपट्टीवर एक पुस्तकच लिहिले होते. त्याने आपल्या गाइड टू द स्टडी ऑफ बुकप्लेट (१८८०) या ग्रंथातून पुरातन ग्रंथपट्ट्यांची, त्यांच्या आकार-प्रकार वैचित्र्यांनुसार सर्वप्रथम वर्गवारी केली आहे. या वर्गवारीमुळे नवीन अभ्यासू व्यक्तींना बरेच मार्गदर्शन घडते व त्यांच्या छंदाच्या दृष्टीने त्यांना ज्ञानाचा एक नवा पैलू हस्तगत करता येतो. लंडन येथील ब्रिटिश म्यूझियम व न्यू हेवन येथील येल युनिव्हर्सिटी लायब्ररी, यांनी केलेला ग्रंथपट्टीसंग्रह सर्वांत मोठा असून त्यात सर्व प्रकारच्या ग्रंथपट्ट्या जतन करून ठेवल्या आहेत. अलीकडे ग्रंथालयात त्या ग्रंथालयाचे बोधचिन्ह व स्थापनावर्ष, ग्रंथाचा दाखल अंक, बोधांक इ. माहिती सुबकपणे नोंदविण्यासाठी ग्रंथपट्टीचा उपयोग पुष्कळदा केला जातो. अशी ग्रंथपट्टी ग्रंथाच्या मुखपृष्ठाच्या मागे चिकटवितात. ग्रंथपट्टी हे ग्रंथाचे सौंदर्यात्मक अंग बनले आहे.