गोविंद विष्णू जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. गोविंद विष्णू जोशी (१९२५ - १९८२) हे एक मराठी वनस्पतीतज्ज्ञ होते. त्यांनी वनस्पतीशास्त्रात मुंबईच्या विज्ञान संस्थेतून पीएच.डी. मिळवली अणि मुंबईच्याच विल्सन महाविद्यालयात १७ वर्षे अध्यापन केले.

त्यांनी सन १९५९ ते १९६१ या काळात अमेरिकेतील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठात क्षारांचा वनस्पतींच्या शारीरिक क्रियांवर परिणाम या विषयावर संशोधन केले.

१९६७ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांनी तेथे अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन केली.

खारफुटी, क्षारयुक्त जमिनीतील झाडे, लवणयुक्त शेतावरील धान्य, क्षारतेचे आणि क्षारांचे प्रकाश संश्लेषणावर व वनस्पती श्वसनावर होणारे परिणाम, या विषयांत प्रा. जोशी यांचे पन्नासवर शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून जागतिक संशोधनकार्यात त्यांचा संदर्भ दिला जातो.

शेती करताना मोठ्या प्रमाणावर खतांचा वापर झाल्यामुळे होणाऱ्या कृषी उत्पादनावरच्या दुष्परिणामांचा जोशींनी अभ्यास केला आणि ते दूर करण्याचे उपाय सुचवले.

जोशी हे इंडियन सोसायटी ऑफ प्लांट फिजिओलॉजिस्ट या संस्थेचे अध्यक्ष होते. आणि त्या संस्थेच्या नियतकालिकाचे प्रमुख संपादक होते. त्यांनी अनेक विद्यापीठांच्या आणि शासनाच्या समित्यांवर काम केले.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • डॉ. गोविंद विष्णू जोशी यांना सर्वोत्कृष्ट प्लांट फिजिओलॉजिस्ट म्हणून प्रा. जे.जे. चिनॉय सुवर्णपदकाचा मान मिळाला होता.
  • १९८० साली मराठी विज्ञान परिषदेने त्यांचा सन्मान केला होता.

संदर्भग्रंथ[संपादन]

  • In Memoriam : Govind Vishnu Joshi [1984] लेखक - H.J. Teas