Jump to content

गोविंददास मन्नुलाल श्रॉफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोविंदभाई श्रॉफ (जुलै २४, १९११ - नोव्हेंबर २१, २००२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात.

स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे.[१]


बिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्तिलढयाचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू.

कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.एस्सी. ( ऑनर्स ). पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. गणित विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले आणि नंतर १९३६ मध्ये त्यांनी एल्एल्.बी. पदवी घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विदयालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविदय मुलीशी झाला (१९३७). त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत.

हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले (१९७०). मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Swami Ramananda Tirtha Institute". Archived from the original on 2011-08-11. 2017-02-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]