Jump to content

गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.[१]

हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.

साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बाधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्र्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराच एक आचार्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या मुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच रहावी अशीच आहे.

या मंदिराचा अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]