गणेशखिंड फळ संशोधन केंद्र
गणेशखिंड फळ संशोधन केंद्र पुण्याच्या गणेशखिंड परिसरातील संशोधन केंद्र आहे.
पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. काही वर्षांनंतर जॉर्ज मार्शल वूड्रो यांनी १८७३मध्ये या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी स्वीकारली. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वतःच्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले. आणि त्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेचे आणि जुन्या झाडांचे संवर्धन केले आहे. उद्यानाच्या सर्व स्थित्यंतरांची कागदपत्रेही उपलब्ध आहेत.
ऐतिहासिक वारसा
[संपादन]पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेले हे संशोधन केंद्र सध्या १४५ एकरमध्ये विस्तारले आहे. ब्रिटिशपश्चात काळात या उद्यानामधून रस्ता झाल्याने ते दोन विभागांत विभागले गेले. नदीकाठाला लागून असलेल्या उद्यानाला हेरिटेजचा मिळावा असा प्रस्ताव आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने या संशोधन केंद्राचे उत्तम डॉक्युमेंटेशन केले आहे, तिथे आढळणारे वृक्ष, वन्यजीव, सूक्ष्मजीवांची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
जैववैविध्याचा अनमोल ठेवा
[संपादन]या गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. याशिवाय, या बागेत १६५ प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील ४८ वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत. विद्यापीठाने या बागेचे बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार केले असून यात वनस्पतींबरोबरच सरपटणारे प्राणी, कासव, बेडूक, किडे आणि तेथील सर्व पिकांची सविस्तर माहिती आहे.
पुण्यातील पहिली हेरिटेज साइट
[संपादन]पुण्यामध्ये ऐतिहासिक वारसास्थळे आहेत. जैवविविध्याने समृद्ध ठिकाणेही शहराच्या विविध भागांत जपलेली आहेत. पण, महाराष्ट्र राज्य सरकारच्या जैववैविध्य विभागात ‘हेरिटेज साइट’चे मानांकन अद्याप कोणाला देण्यात आलेले नाही. राहुरी कृषी विद्यापीठाचे गणेशखिंड फळ संशोधन केंद्र हा दर्जा मिळविणारे पहिले स्थळ ठरणार आहे.